वाणेवाडीचे तथाकथित महाराज  :  मुंह में राम बगल में छुरी ... 

 
s

धाराशिव तालुक्यातील वानेवाडी येथील अध्यात्माचे धडे देणाऱ्या आश्रमशाळेतील एका विद्यार्थांने शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. संस्थाचालक काका महाराज आणि अध्यात्माचे धडे देणाऱ्या महाराजांनी दांडपट्ट्यानी बेदम मारहाण केल्याने दहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थांने गळफास घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे तर मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर त्याचे प्रेत नंतर झाडास लटकवण्यात आले आणि सदर विद्यार्थाने आत्महत्या केल्याचा बनाव  करण्यात आला, असा आरोप पालकांनी केला आहे. या  विद्यार्थांच्या हातापायांवर मारहाणीच्या जखमा आहेत. ढोकी पोलिसांनी  संस्थाचालक काका उंबरे , गोपाळ महाराज, प्रशांत मारुती नांदे,माउली महाराज उंबरे  आणि मनोहर झ्क्के  यांच्यावर भादंवि ३०५, ३२४,३२३ ,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.पण भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

f

 

संस्थाचालक काका उंबरे  हे स्वतःला वारकरी आणि महाराज म्हणतात पण मुंह में राम बगल में छुरी असेच त्यांचे वर्तन होते. अध्यात्मिक शिक्षणाच्या नावावर काका महाराजांनी गावात गोरखधंदा मांडला आहे . आश्रमशाळेत आम्ही गोरगरीब विद्यार्थाना कमी खर्चात शिक्षण देतो म्हणून दानशूर लोकांकडून देणग्या गोळा करायच्या आणि हा पैसा आश्रमशाळेवर खर्च न करता, शेती आणि जमीन घेण्यासाठी करायचा असा त्यांच्यावर आरोप आहे.  आश्रमशाळेतील विद्यार्थाकडून स्वतःच्या शेतीतील आणि घरातील  कामे करून घ्यायची आणि कामे नाही केल्यास त्यांना बेदम मारहाण करण्याचे पाप देखील हे महाराज करीत होते. त्यातूनच वाखरवाडीतील प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) या विद्यार्थांचा नाहक बळी गेला आहे. प्रेम शिंदे याच्या  वडिलांची बाईट ऐकली तर सर्व प्रकार नक्कीच कळेल. 

हे प्रकरण घडल्यानंतर महाराजांचा एक नातलग , जो स्वतःला स्टार पत्रकार समजतो त्याने  पोलिसांवर दबाव आणून हे प्रकरण  रफादफा करण्याचा प्रयत्न केला, पण धाराशिव लाइव्हने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडल्यामुळे संस्थाचालक काका उंबरे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल  झाला आहे. गुन्हा दाखल  झाल्यानंतर त्याच्या बातम्या सर्व  चॅनल्स आणि वृत्तपत्रात झळकल्या  पण 'उघडा  डोळे बघा नीट' चॅनलवर 'मधली ओळ' देखील आली नाही. कुकर्मीचे  हे कुकर्म धाराशिव लाइव्हने अनेक वेळा उघडकीस आणुन त्याचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. २० वर्षांपूर्वी धाराशिव बसस्थानकावर एसटीडी सेंटरवर सलग तीन वर्षे दरमहा ३०० रुपयावर काम करणारा कुकर्मी नंतर पत्रकारितेत कसा आला आणि दांडके हातात घेऊन लाखो रुपयाची संपत्ती गोळा केली,याचे रसभरीत किस्से आहेत. वानेवाडीतील आश्रमशाळेत आणि शेतीत देखील कुकर्मीचा पैसा  गुंतल्याची चर्चा आहे.त्यामुळेच गेली तीन दिवस तो अस्वस्थ होता. 

f

या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची गरज आहे. दि. ४ ते ६ ऑगस्टपर्यत ढोकी पोलीस स्टेशनला कुणाकुणाचे फोन आले , त्याचे सीडीआर तपासण्याची गरज आहे. ढोकी  पोलीस स्टेशनमध्ये मागील तीन दिवसात कोण कोण जाऊन बसले त्याचे सीसीटीव्ही देखील ताब्यात घेण्याची गरज आहे.  प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) या विद्यार्थांने आत्महत्या केली की  त्याचा खून करून नंतर प्रेत झाडास लटकवण्यात आले, याची कसून चौकशी होण्याची गरज आहे. यासाठी हे प्रकरण ढोकी पोलिसांकडून काढून सीआयडीकडे देण्याची गरज आहे, तसेच या आश्रमशाळेची मान्यता तातडीने रद्द करण्याची गरज  आहे तरच अध्यात्माच्या आणि वारकरी संप्रदायाच्या  नावावर सुरु असलेला पांढऱ्या कपड्यातील हा  काळा धंदा बंद होईल. 


- सुनील ढेपे
संपादक, धाराशिव लाइव्ह 
मो - ७३८७९९४४११

From around the web