एपीआय माळाळे यांची वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून गोळ्या झाडून आत्महत्या

आत्महत्येची सीआयडीमार्फत चौकशी करा
 
w

 धाराशिव -  नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे धाराशिवचे सुपुत्र आनंद माळाळे यांंनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी सीआयडी चौकशी करून दोषींवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी लेखी मागणी माळाळे यांच्या कुटुंबीयांसह समाजबांधवांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

धाराशिव शहरातील भीमनगर येथील रहिवाशी असलेले आनंद प्रकाश माळाळे हे मागील 25 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलात विविध पदावर सेवेत होते. माळाळे हे आपल्या कुुटुंबीयांसह सोलापूर येथे वास्तव्यास होते. मागील सहा महिन्यांपूर्वी त्यांची नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बदली झाली होती. मात्र वरिष्ठांकडून त्यांना वेळोवेळी प्रशासकीय मदत मिळाली नाही. त्यांना तपासासाठी अनेक गुन्हे देण्यात आले होते. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असणारे व मुदतीत दोषारोप पाठविणे आवश्यक असणार्‍या अनेक गुन्ह्यांचा तपास त्यांना देवून वेळेची मर्यादा घालून देण्यात आली. वरिष्ठांनी माळाळे यांना कुठलीही मदत न करता, गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा व्हावा, दिरंगाई व्हावी, आरोपीला मदत होईल, असे काम केले. वरिष्ठांनी विनाकारण जाणीवपूर्वक व हेतुपूर्वक जातीय द्वेष मनात ठेवून त्यांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.

माळाळे हे मागील सहा महिन्यांपासून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या या मानसिक त्रासामुळे त्रस्त होते. एक महिन्यापूर्वी माळाळे यांचा अपघात झाल्याने ते वैद्यकीय रजेवर होते. या काळात वरिष्ठांनी वेळोवेळी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी माळाळे यांच्यावर दबाव आणला. यातून होणार्‍या त्रासाला कंटाळून त्यांनी शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी पहाटे सोलापूर येथील राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

s

याप्रकरणी आनंद माळाळे यांच्या पत्नी किंवा मुलगा यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून पोलीस अधीक्षक हानपुडे-पाटील, पोलीस निरीक्षक नरूटे, श्री. कासेकर व इतर दोष अधिकारी, कर्मचार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटी कायदा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

या निवेदनावर वंदना माळाळे, रंजना माळाळे, यशवंत माळाळे, मयूर माळाळे, राजाभाऊ ओव्हाळ, विशाल शिंगाडे, रवी माळाळे, पुष्पकांत माळाळे, सिध्दार्थ बनसोडे, संदीप बनसोडे, संग्राम बनसोडे, प्रमोद हावळे, राजाभाऊ बनसोडे, मिलींद बनसोडे, नवज्योत शिंगाडे, विद्यानंद बनसोडे, प्रमोद वाघमारे, विजय बनसोडे, आप्पासाहेब सिरसाटे, गणेश वाघमारे, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व इतरांची स्वाक्षरी आहे. 
 

From around the web