निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनो ! ऑनलाईन फसवणूकींपासून सावध रहा

कोषागार अधिकाऱ्यांचे आवाहन
 
ddd

धाराशिव - धाराशिव जिल्हा कोषागाराचे अधिनस्त सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना कोषागारामार्फत निवृत्तीवेतन,सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतनविषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात.हे लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रक्कमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करुन संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही.कोषागार कार्यालयामार्फत फक्‍त लेखी स्वरुपात पत्रव्यवहार केला जातो.

  याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करुन ऑनलाईन काही रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जाते आहे.याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयातून केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठवले जात नाही.

सर्व निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचाऱ्यांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरुन उपरोक्त प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन,गुगल पे,फोन पे किंवा इतर ईलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही. तरी कोणीही अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये.याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहील,याची नोंद घ्यावी.तसेच अशा प्रकारच्या दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया कोषागार कार्यालयास अवगत करावे.तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अर्चना अभिमन्यू नरवडे व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांच्याकडून करण्यात येत आहे.

From around the web