प्रेम शिंदे मृत्यू प्रकरण : उघडा डोळे, बघा नीट ...
वाणेवाडी येथे श्रद्धेचा बाजार मांडून लोकांकडून देणग्या गोळा करणाऱ्या काका उंबरे आणि त्याच्या पंटरनी प्रेम शिंदे ( वय १४ रा. वाखरवाडी ) या गरीब विद्यार्थांचा बळी घेतला. प्रेम शिंदे याचे वडील मोलमजुरी करून आपल्या दोन मुली आणि एकुलत्या एक मुलाचे पालनपोषण करून शिक्षणाचा भार उचलत होते.मुलाला शिक्षणाबरोबर अध्यात्माचे शिक्षण द्यावे, जेणे करून तो समाजात आदर्श ठरेल, असे त्यांचे स्वप्न होते, पण त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले.
प्रेम शिंदे हा निवासी शाळेतून दि. ४ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाल्यानंतर काका उंबरे याने प्रेमचे वडील लहू शिंदे ( वाखरवाडी ) यांच्याशी संपर्क साधला नाही, पण ढोकी पोलीस स्टेशन गाठून मिसिंगची फिर्याद दिली., त्यानंतर प्रेम शिंदे याचा मृतदेह सापडल्यानंतर ढोकी पोलीस स्टेशनमध्ये जबाब देण्यास गेले पण लहू शिंदे यांच्याशी संपर्क साधला नाही, यावरून पाणी कुठं तरी मुरत आहे, हे लक्षात येते.
ढोकी पोलीस स्टेशनमध्ये लहू शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पाच पैकी तीन आरोपीना दोन दिवसात अटक केली पण मुख्य आरोपी असलेल्या काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे याना आज १० दिवस झाले तरी अटक केलेली नाही. ढोकी पोलीस दबावाखाली काम करीत असल्याचे यावरून स्पष्ट होते. काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यांना पोलिसांनी अभय दिले असून पळून जाण्यास अप्रत्यक्ष मदत केली आहे, हे स्पष्ट झाले आहे.
फिर्यादी लहू शिंदे आणि ग्रामस्थांनी पालकमंत्री प्रा. तानाजी शिंदे यांची चार दिवसापूर्वी भेट घेऊन आपली कैफियत मांडली , यावेळी सावंत यांनी मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यांना २४ तासात अटक करण्याचे निर्देश ढोकी सपोनि राऊत यांना दिले, पण पोलिसांनी सावंत यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी याप्रकरणी गंभीर दिसत नाहीत. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असताना, जागोजागी वृक्षारोपण करण्यात ते मग्न आहेत. लोकांना पोलीस अधीक्षक आहेत की , वन अधिकारी असा संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यात खून, हाफ मर्डर, चोऱ्या, हाणामाऱ्या यांचे प्रमाण वाढले असताना, पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांचे याकडे लक्ष नाही, एकंदरीत पोलीस यंत्रणा ढिसाळ झाली आहे.
आरोपी आणि कुकर्मीचे संबंध काय ?
यातील मुख्य आरोपी काका उंबरे हा उघडा डोळे बघा नीटच्या कुकर्मीचा मावसभाऊ आहे. कुकर्मीचा सांभाळ काका उंबरेच्या आईने केला आहे. एकेकाळी धाराशिव बसस्थानकावर एसटीडी सेंटरमध्ये तीन वर्षे तीनशे रुपयावर काम करणारा कुकर्मी पत्रकारितेत कसा आला आणि नंतर लाखो रुपयाची माया कशी कमावली याचे अनेक किस्से आहेत.
काका उंबरे याच्याकडे ५० एकर शेतजमीन कुठून आली, निवासी शाळा उभारण्यासाठी लोकांकडून बातमीच्या मोबदल्यात देणग्या कश्या गोळा केल्या हे आता लपून राहिलेले नाही. शेती काका उंबरेची आहे तर आपल्या वरिष्ठाना घेऊन आधुनिक शेती दाखवण्यासाठी कुकर्मी वाणेवाडीत का जातो ? हा आमचा सवाल आहे.
कुकर्मीनेच आरोपी काका उंबरे यास पहिले दोन दिवस आश्रय दिल्याचे समोर येत आहे. तसेच पोलिसांवर देखील कुकर्मीनेच दबाब आणल्याची चर्चा सुरु आहे. या प्रकरणाची बातमी वृत्तपत्रात आणि चॅनलमध्ये येऊ नये म्हणून कुकर्मीने एका गावकरी रेड्यामार्फत फिल्डिंग लावली, पण धाराशिव लाइव्हने इतरांसारखे मिंधे न होता, प्रकरण लावून धरले आहे. कुकर्मीने पत्रकाराना पाकिटे दिल्याचा आरोप खुद्द फिर्यादी लहू शिंदे यांनी पालकमंत्री सावंत यांच्यासमोर केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्यासाठी ढोकी पोलीस स्टेशनमधील दि. ४ ते ६ ऑगस्टचे सीसीटीव्ही फुटेज आणि सपोनि जगदीश राऊत आणि पोलीस उपनिरीक्षक गाडे यांच्याबरोबर या काळात कोणाकोणाचे संभाषण झाले याचे सीडीआर तपासण्याची गरज आहे. हे प्रकरण तातडीने सीआयडीकडे सोपवण्याची गरज आहे,तरच या प्रकरणी खरे आरोपी समोर येतील आणि प्रेम शिंदे याच्या कुटुंबाला न्याय मिळेल.
- सुनील ढेपे
संपादक, धाराशिव लाइव्ह
मो- ७३८७९९४४११