तुळजाभवानीच्या दान पेटीवर दरोडा घालणारा नाईकवाडी जेरबंद , पण साथीदार कधी अटक होणार ? 

 
s

महाराष्ट्रात देवीचे साडेतीन शक्तीपीठ आहेत. त्यातील तुळजापूरची तुळजाभवानी ही प्रमुख शक्तीपीठ आहे. ही देवी अनेकांची कुलदेवता असल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून लाखो भाविक दररोज तुळजापूरला दर्शनासाठी येत असतात. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे मंदिर बंद आहे. तरीही मातेच्या पायरीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत आहेत. 

तुळजाभवानी ही नवसाला पावणारी देवी आहे. त्यामुळेच अनेक भाविक देवीस नवस बोलतात. कुणाला वंशाला दिवा नसेल, मुलबाळ नसेल, घरात भांडण - तंटा असेल, कुणाचं आरोग्य ठीक नसेल, ही सारी गाऱ्हाणी भक्तमंडळी देवीला सांगतात, तसेच नवस देखील  बोलतात. बोललेला नवस पूर्ण झाला की  पुन्हा तुळजापूरला  येतात आणि  सोन्याचे दागिने, पैसे मोठ्या श्रद्धेने अर्पण करतात. 

याच सोन्याच्या दागिन्यांवर दरोडा घालण्याचे काम मंदिरातील काही अधिकारी करीत होते. त्यातील प्रमुख दरोडेखोर म्हणजे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी . याने देवीच्या दान पेटीवर दरोडा घालून लाखो रुपये कमावले.त्यातून स्वतःचा बंगला बांधला, शेती घेतली. आपली चोरी उघडी पडू नये म्हणून त्याने काही पुढारी पोसले. त्यामुळेच काही पुढारी देखील नाईकवाडी यास पाठीशी घालण्याचे काम केले. त्यामुळे तो  निवृत्त झाला तरी मुदतवाढ देण्याचे काम करण्यात आले. 

पण पापाचा घडा भरला की एक दिवस उलथणारच. तसेच नाईकवाडी याचे झाले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील  सोन्या चांदीचे दागिने तसेच ७१ ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी केली होती, त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती.

मौल्यवान दागिन्यांच्या या चोरी प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस चौकशी अहवालात करण्यात आली होती. अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानुसार तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलिप नाईकवाडी यांच्यावर अफरातफर आणि गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र अनेक महिन्यांपासून प्रत्यक्षात नोंदविण्यात आला नव्हता. गुरुवार १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कौस्तुक दिवेगावकर यांनी शासनाच्या आदेशानुसार याप्रकरणी दिलीप  नाईकवाडी याच्यावर मौल्यवान व ऐतिहासीक दागिन्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश मंदिर समितीचे विश्वस्त तथा तुळजापूर तहसीलदार यांना दिले . 


 तुळजाभवानी मातेला निझाम ,औरंगजेब , पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवी चारणी अर्पण केली होती . या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती मात्र २००५ व  २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी तत्कालीन धार्मिक सह व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.

मंदिराच्या खजिन्याच्या एकूण अकरा चाव्या होत्या मात्र यापैकी तीन चाव्या हरवल्या आहेत. देवीच्या अंगावरील दागिने ठेवण्यासाठी पाच पेट्या आहेत. यातील चौथ्या पेटीत अकरा दागिन्यांची नोंद होती, ज्यात चांदीच्या पादुका गायब असल्याचं आढळलं. पाचव्या पेटीतील अलंकारही पळवून नेले असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांत 13 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यांनतर नाईकवाडी यास अटक करण्याचे धाडस पोलीस करीत नव्हते. एक वर्षे हा उजळ माथ्याने फिरत असताना, पोलीस त्याला अटक करीत नव्हते. मग कुणाचा दबाब होता ? एपी राजतिलक रौशन यांची बदली होताच, पोलिसांना जाग आली आणि एक वर्षानंतर रविवारी रात्री पोलिसांनी नाईकवाडी यास बेड्या ठोकल्या आहेत. त्यास न्यायालयाच्या आदेशानुसार सहा दिवस पोलीस कोठडीत डांबण्यात आले आहे. 

तुळजाभवानीच्या दान पेटीवर दरोडा घालणारा एकटा नाईकवाडी नाही. आणखी बरेच आरोपी आहेत. त्यात काही राजकीय पुढारी आणि अधिकारी सुद्धा आहेत. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी चोरी केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. देवी जागृत आहेत. पापाचा घडा भरला की बरोबर जेलमध्ये पाठवते. आता पुढचा नंबर कुणाचा हे पाहणे, औत्सुक्याचे आहे. पोलिसाना देवी सद्बुद्धी देवो, हीच प्रार्थना.

- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 

https://osmanabadlive.com/

( हा लेख आपणास कसा वाटला हे आमच्या व्हाट्स अँप वर कळवा - 7387994411  )

From around the web