अखेर रौशन मुंबईला गेले ...  

पहिल्या महिला एसपी नीवा जैन यांच्यासमोरील आव्हाने !
 
ds

अखेर एसपी राजतिलक रौशन मुंबईला गेले ! नूतन पोलीस अधीक्षक नीवा जैन जॉईन होण्याअगोरच पोलिसांनी त्यांना मंगळवारी निरोप दिला. फुलांच्या पायघड्या घालून, गुलाब पुष्पांचा वर्षाव करीत  सजवलेल्या गाडीतून त्यांना टाटा - बाय बाय करण्यात आले. इतके कोणते मोठे कर्तृत्व आणि कर्तव्य  रौशन यांनी पार पाडले म्हणून पोलिसांनी फुलांचा वर्षाव केला, असा प्रश्न आम जनतेला पडला आहे. संतापाची बाब म्हणजे, कोरोनासंबंधीत नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिस विभागाकडूनच कोरोना प्रतिबंधक नियम अक्षरश: पायदळी तुडवण्यात आले.जिल्ह्यात सध्याही कोरोना संसर्गाचे वातावरण आहे, याची जाणीवही कोणाला नव्हती. यावेळी कोरोना खरोखरच संपला आहे की काय, असा भास होत होता.मास्क न वापरता,  सुरक्षित अंतर न ठेवता , कोरोनाचे नियम पायदळी तुडवत पोलिस अधीक्षकांना अखेर निरोप देण्यात आला. 

d

 रौशन यांच्या जागी पुण्याहून आलेल्या नीवा जैन यांची उस्मानाबादच्या पहिल्या महिला पोलीस अधीक्षक म्हणून नोंद होणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फोफावलेले अवैध धंदे, वाढती गुंडगिरी, बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था तसेच अनेक गंभीर गुन्हयातील आरोपीना  पकडणे आदी आव्हाने नीवा जैन  यांच्यासमोर राहणार आहेत.

उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची दोन वर्षानंतर मुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांची  औरंगाबाद  तर उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांची ठाणे येथे  बदली झाली आहे. एकाच वेळी हे  'त्रिकुट' हलल्यामुळे आता तरी जिल्ह्यात पोलिसांचा कारभार पारदर्शक होईल,  अशी अपेक्षा आहे. पोलीस दलात नाकापेक्षा 'मोती' जड झाला होता तसेच अंधारच अंधार झाला होता.  


'चोराला मेसाई धार्जिण' अशी एक ग्रामीण भागात  म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय  जिल्ह्यात वारंवार येत होता. मावळते पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या काळात जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले होते. त्यामुळेच क्रीम पोस्टिंग मिळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यात एक प्रकारची स्पर्धा लागली होती. यातून जिल्ह्यात सर्वच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हातभट्टीची दारू, मटका, जुगार, वेश्या व्यवसाय आदी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. जिल्ह्यात कधी नव्हे उघड - उघड मटका घेतला जात आहे.ऑनलाईन जुगार खेळला जात आहे. आमचे अवैध धंदे बंद केले तर पोलिसांचा हप्ता बंद होईल, असे मटका किंग पोलिसांच्या तोंडावर बोलत आहेत. त्यातून गुन्हेगारी वाढली आहे तसेच पोलिसांची मुजोरी देखील वाढली आहे.

पोलीस हप्तेखोरीत अडकल्यामुळे पोलीस खाते बदनाम झाले आहे.  तुळजापूर गांजा प्रकरणात  हात ओले केल्यामुळे  एका पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस कर्मचारी निलंबित, उस्मानाबादेत एका मुस्लिम तरुणास मारहाण केल्याप्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल , तुळजापुरात सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांचे सहकारी रवींद्र ढवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून पोलीस कोठडीत बेदम मारहाण करणाऱ्या डीवायएसपी दिलीप टिपरसे, तत्कालीन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सपोनि राठोड, पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे यांच्यासह आठ पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल,  वाहन चालकांकडून उघड उघड हप्ता घेतल्यामुळे बेंबळीचा पोलीस निलंबित, तेर पोलीस चौकीत राजकीय पुढाऱ्याला लाजवेल असा पोलिसांचा वाढदिवस आदी प्रकरणे पोलिस खात्याला काळिमा फासणारी ठरली.

गेल्या दोन वर्षात १५  ते २० पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. तसेच लोकांना विनाकारण मारहाण केली म्हणून १० ते १५ पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. इतकी वाईट परिस्थिती यापूर्वी कधी झाली नव्हती. उस्मानाबाद तालुक्यात २०१५ मध्ये  वाघोली येथे एका अनोळखी माहिलेचे शव आढळले होते, हे  गुंतागुंतीचे खून प्रकरण उघडकीस आणल्यामुळे राजतिलक रौशन यांना सर्वोत्कृष्ट ‘अपराधसिध्दी’ प्रशस्तीपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले, ही एकमेव चांगली बाजू सोडली तर रौशन यांच्या काळात पोलीस दलात बजबजपुरी माजली होती.

रौशन यांनी काही प्रकरणात ठोस कारवाई केली असली तरी काही प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले होते .साहित्य संमेलनाच्या वेळी झी २४ तासचे रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसानी बेदम मारहाण करून देखील कारवाई न करणे, त्याविरुद्ध आवाज उठविला म्हणून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करणे, तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांच्या मुलाला सूडबुद्धीने हद्दपार करणे, एका महिला पोलीस उपनिरीक्षकाचा छळ केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक खाडे यांना पाठीशी घालणे , त्याचबरोबर पोलिसांच्या बदल्या करताना भेदभाव केला म्हणून काही पोलीस कर्मचारी थेट मॅटमध्ये गेले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे प्रकरणी त्यांना  पाच हजार दंड झाला होता.

राज तिलक रौशन यांच्या दोन वर्षाच्या काळात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मुजोर झाले होते. पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत, ही भावना तयार होण्यासाठी उस्मानाबादला पहिल्या महिला पोलीस अधीक्षक नीवा जैन यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फोफावलेले अवैध धंदे, वाढती गुंडगिरी, बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, तसेच अनेक गंभीर गुन्हयातील आरोपी पकडणे ही आव्हाने नीवा जैन मॅडम यांच्यासमोर राहणार आहेत.पोलिसांवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. तो पुन्हा  मिळवावा लागेल. 

 हावरगावच्या शंभू महादेव साखर कारखान्याने  परळी येथील वैजनाथ बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या ४६ कोटी रुपयाच्या साखर घोटाळा प्रकरणी  गुन्हा दाखल होवून आजमितीस सतरा  महिने झाले पण ४० पैकी फक्त चारच आरोपीना अटक करण्यात उस्मानाबादच्या पोलिसांना यश आले आहे. बाकी ३६ आरोपी उजळ माथ्याने फिरत असताना  पोलीस गांधारीप्रमाणे डोळ्यावर काळी पट्टी बांधून गप्प आहेत. तसेच तुळजापूर नगर पालिकेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी २४ जणांवर गुन्हा दाखल होवून दोन वर्षे झाली तरी केवळ चारच आरोपीना अटक झाली आहे. बाकी आरोपी तुळजापुरात मोकाट फिरत असताना, पोलीस थंड आहेत.तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या दान पेटीवर दरोडा टाकणारा तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याच्यावर गुन्हा दाखल होवून एक वर्षे झाले तरी पोलीस त्याला अटक करीत नव्हते. लोहाऱ्यात एका शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल होवून दहा दिवस झाले तरी पोलीस आरोपी असलेला जिल्हा कृषी अधिकारी उमेश बिराजदार यास अटक करीत नाहीत , हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून सुरु होते ?

यापूर्वी  पंकज देशमुख एसपी असताना रौशन उस्मानाबादला सहाय्यक पोलीस अधीक्षक होते. त्यावेळीही असेच कारनामे केले होते. तुळजाभवानी साखर घोटाळ्याप्रकरणी एका उद्योगपतीला पाठीशी घातले होते. चोर सोडून संन्याश्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.उस्मानाबाद जिल्हा मोठे कुरण आहे, हे माहित झाल्यामुळे ते  पुन्हा पोलीस अधीक्षक म्हणून आले आणि पोलीस खाते अधिक भ्रष्ट झाले. 

नूतन पोलीस अधीक्षक नीवा जैन या मूळ उत्तर प्रदेशातील असून, जम्मू - काश्मीरमध्ये अनेक वर्ष काम केलं आहे. २००८ च्या आयपीएस असलेल्या  नीवा जैन यांना केंद्र सरकारने शौर्य पदक देऊन गौरव केला आहे. २५ मार्च २०१५ मध्ये  जम्मू - काश्मीरमध्ये कठुआ येथील राजबाग पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यानी हल्ला चढविला असता, पोलीस अधीक्षक असलेल्या नीवा जैन  चोख प्रत्युत्तर दिले होते. २०१८ मध्ये त्यांची महाराष्ट्रात बदली झाली होती. अमरावती, पुणे येथे काम केल्यानंतर उस्मानाबादला पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.त्यांना उस्मानाबाद लाइव्हच्या शुभेच्छा ! त्या डॅशिंग लेडी एसपी म्हणून नावलौकिक मिळवतील, अशी अपेक्षा ...

- सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 

https://osmanabadlive.com/

( हा लेख आपणास कसा वाटला हे आमच्या व्हाट्स अँप वर कळवा - 7387994411  )

From around the web