चव्हाणांची मुजोरी ! पोलिसांची बदनामी !!

 
s

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'' हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत. मात्र उस्मानाबादच्या आनंदनगर पोलिसांनी या ब्रीदाला काळिमा फासण्याचे कृत्य केलं आहे. मुंबईच्या क्राईम ब्रँच मधील सचिन वाझे प्रकरणापासून पोलिसांनी अजूनही धडा घेतलेला दिसत नाही.वाझे सारखे अनेक पोलीस निरीक्षक राज्यात अनेक ठिकाणी आहेत. त्यातील एक पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण. 

शहरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका पान टपरीवर २१ ऑगस्ट ( शनिवारी ) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रिक्षाचालक फरीद शेख ( वय २६, रा. विकासनगर)  हा तरुण उभारला होता. यावेळी आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण आणि त्यांचा चालक मुक्रम पठाण आले आणि त्यांनी  टपरी चालकास पान-सुपारीची मागणी केली यावेळी अन्य दोन ग्राहक उभारले होते. पान टपरी चालकास पान देण्यास उशीर झाल्याने पोलीस निरीक्षक चव्हाण यांचा चालक मुक्रम पठाण याने ' तुला साहेब दिसत नाहीत का ? तुला पोलिसांचा इंगा दाखविला पाहिजे असे म्हणून अश्लील शिवीगाळ सुरु केली. 

यावेळी टपरी चालकाचा मित्र फरीद शेख याने पठाण यास शिवीगाळ करू नका म्हणून मध्यस्थी केली असता, तू मध्ये पडू नको म्हणून पठाण याने त्यासही शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर त्याने पोलीस गाडीत बस म्हणून जबरदस्तीने गाडीत बसविले आणि आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये नेले. आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक चव्हाण,  मुक्रम पठाण आणि अन्य दोन पोलिसांनी फरीद शेख यास लाथाबुक्यांनी आणि बेल्स्टने डोक्यावर आणि हातापायावर रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली. 

ds

फरीद शेख याच्या डोक्यावर आणि हातावर दोन काठ्यांनी किमान २० ते २५ वेळा तसेच २० ते २५ वेळा लाथा आणि बेल्टने पोलिसांनी बेदम मारहाण केली. यावेळी पोलीस निरीक्षक चव्हाण शुद्धीवर नव्हते, अशी चर्चा आहे. एक लाथ मारून ते स्वतःच खाली पडत होते, असे फरीद शेख सांगतो. फरीदचे वय २८ असले तरी शरीराने तो उंचापुरा, जाडजूड, सशक्त , ताकदवान आहे, कसलाही गुन्हा केला नसताना पोलिसांनी त्यास एखाद्या जनावरांप्रमाणे मारहाण केली. फरीदच्या जागी दुसरा कुणी असता तर तो जागीच मरण पावला असता, इतक्या अमानवी पद्धतीने त्यास मारहाण करण्यात आली. बरं गुन्हा काय तर ? काहीच नाही. पोलिसांना मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला ? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. 

फरीद शेख यास मारहाण झाल्याचे कळताच, त्याचे नातेवाईक आणि मुस्लिम समाजातील अनेक लोक पोलीस स्टेशनला धावले. त्यांनी रात्रीच पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर फरीद शेख यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उस्मानाबाद लाइव्हने हे प्रकरण उचलून धरले. फरीद शेख याने पोलिसांच्या विरोधात जबाब देऊन नये म्हणून त्याच्यावर दबाब टाकण्यात आला. पोलीस स्टेशन आणि ज्या ठिकाणी घटना घडली तेथील सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले.तरीही केवळ उस्मानाबाद लाइव्हच्या पाठपुराव्यामुळे अखेर दि. २४ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण , त्यांचा चालक मुक्रम पठाण आणि अन्य एक पोलीस कर्मचारी अश्या तिघांवर फरीद शेख मारहाण प्रकरणी भादंवि ३४१, ३२४,३२३,५०४,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतकी झटपट कारवाई केल्याबद्दल पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांचे अभिनंदन करायला पाहिजे. त्यांनी पोलिसांना यावेळी पाठीशी घातले नाही, हे एक जाता -जाता चांगले काम केले. एखाद्या पोलीस निरीक्षकावर मारहाण प्रकरणी त्याच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होण्याची शहरातील ही पहिलीच वेळ आहे. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करून अटक करावे तसेच पुरावा नष्ट केला म्हणून आणखी कलमे वाढून पोलीस कस्टडी घ्यावी तरच अश्या मुजोर पोलीस कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे. कायदा हा सर्वाना सारखा आहे, याचा संदेश यानिमित्त गेला पाहिजे. 


पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण हे आनंदनगर पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून अनेक प्रताप केले आहेत. उपळे ( मा. ) येथील दोन तरुणावर चोरीची फिर्याद देण्यास गेले असता खोटा गुन्हा दाखल करणे, एका मेडिकलमध्ये काम करणारा तरुण फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास गेल्यानंतर तुम्हीच बंगलोरला जाऊन आरोपीचा शोध घ्या म्हणून सल्ला देणे हे अलीकडील उदाहरणे सांगता येतील. 

सन २०१६ मध्ये आनंदनगर पोलीस स्टेशन सुरु झाले. या पोलीस स्टेशनला पहिला भ्रष्ट सपोनि दिगंबर शिंदे लाभला. तेव्हापासून या पोलीस स्टेशनला पनवती  लागली आहे. त्यानंतर आलेला पोलीस निरीक्षक खाडे याने एका महिला उपनिरीक्षकाचा केलेला छळ, त्यानंतर एका पोलिसाने तिच्या हत्येचा केलेला प्रयत्न आणि आता पोलीस निरीक्षक चव्हाण यांचे प्रताप यामुळे आनंदनगर पोलीस स्टेशन बदनाम झाले आहे. 

फरीद शेख मारहाण प्रकरणी उस्मानाबाद लाइव्हने आवाज उठविला नसता तर पोलिसांनी त्याच्यावरच खोटा गुन्हा दाखल करून प्रकरण रफादफा केले असते. उस्मानाबाद लाइव्ह सोडले तर एकाही पत्रकाराने या प्रकरणाची बातमी दिली नाही. पॉकेट आणि पॅकेज पत्रकारितेमुळे उस्मानाबादची पत्रकारिता बदनाम झाली आहे. काही दलाल हा क्षेत्रात घुसल्यामुळे लोकांचा पत्रकारितेवरील विश्वास उडाला आहे. पण उस्मानाबाद लाइव्ह लोकांच्या आशेचा किरण  बनला आहे. लोक जितक्या विश्वासाने आम्हाला माहिती देतात , आपले प्रश्न आणि अडचणी सांगतात तसेच झालेला अन्याय, अत्याचार मांडतात त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जावू दिला जाणार नाही.

उस्मानाबाद लाइव्ह १० वर्षांपूर्वी सुरु झाले, तेव्हापासून अनेक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. समोरचा कुणीही असला तरी त्याचा मुलाहिजा ठेवला नाही. पोलीस आमचे शत्रू नाहीत, पोलिसांमधील वाईट प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. ज्या पोलिसांनी चांगले काम केले आहे त्यांच्या कौतुक करणाऱ्या बातम्या ठळकपणे देणारा उस्मानाबाद लाइव्हच आहे आणि खाकी वर्दी घालून कुणी कायदा हातात घेत असेल तर त्याचा खरा चेहरा समोर आणणारा उस्मानाबाद लाइव्हच आहे. भले सत्य आणि निर्भीड पत्रकारिता करीत असताना आमच्यावर कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी आमचा निर्भीड, निष्पक्ष, सडेतोड पत्रकारितेचा बाणा कधी सोडणार नाही. दलाली तर अनेक पत्रकार करतात पण प्रामाणिक आणि सत्य पत्रकारिता करणारा उस्मानाबाद लाइव्ह सदैव जनतेसोबत असेल, अशी ग्वाही आम्ही या निमित्त देतो. 

सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 

https://osmanabadlive.com/

( हा लेख आपणास कसा वाटला हे आमच्या व्हाट्स अँप वर कळवा - 7387994411  )

From around the web