धाराशिव नामांतर : उस्मानाबाद लाइव्हचे नामांतर कधी होणार ?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताना जाता - जाता उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर केला. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा प्रस्ताव आता फडणवीस - शिंदे यांच्या मंत्रिमंडळ काळात विधीमंडळात येईल. विधानसभा आणि विधान परिषदमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो केंद्राकडे जाईल. केंद्र सरकार रेल्वे, पोस्ट आदी सहा खात्याचे ना हरकत आल्यानंतर नामांतरास मंजुरी देईल. त्यानंतर शासकीय गॅझेटमध्ये बदल होऊन उस्मानाबादचे खऱ्या अर्थाने नामांतर होईल , त्यात मुस्लिम समाज नेते कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे नामांतर न्यायालयीन कचाट्यात अडकले तर उस्मानाबादचे नामांतर पुन्हा लांबणीवर पडेल.
आता राहिला प्रश्न उस्मानाबाद लाइव्ह नामांतराचा . उस्मानाबाद लाइव्ह हे दैनिक वृत्तपत्राचे अधिकृत टायटल आहे. त्याची नोंदणी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या अंतर्गत असलेल्या RNI कडे झाली आहे. ( Osmanabad Live टायटल कोड नंबर - MAHMAR45574 RNI नंबर MAHMAR/2015/61537 ...
जो पर्यंत केंद्र सरकार उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करत नाही, तोपर्यंत उस्मानाबाद लाइव्हच्या टायटल मध्ये बदल होणार नाही.
कालपासून सोशल मीडियावर अनेकांनी उस्मानाबाद लाइव्हचे आता नाव धाराशिव करा म्हणून सल्ला देत आहेत. या सल्लाचे आम्ही नक्की स्वागत करतो पण वाचकांनी आमची अडचण समजून घ्यावी. पण आम्ही आता एक बदल करणार आहोत - बातमीत उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करणार आहोत. जसे की धाराशिव ( उस्मानाबाद ) .
आम्हीही शासकीय गॅझेटमध्ये उस्मानाबादचे नामांतर धाराशिव कधी होईल, याची वाट पाहणार आहोत. त्यानंतर आम्हीही अधिकृतरीत्या उस्मानाबाद लाइव्हचे नामांतर धाराशिव लाइव्ह करू.
- सुनील ढेपे
संपादक
# 7387994411