DCC BANK : कोण कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला ?

 
dcc bank

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक दिवाळखोरीत निघाली आहे. दिवाळखोरीत निघालेल्या या बँकेच्या सत्तेच्या चाव्या स्वतःकडे ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात महाविकास आघाडी स्थापन झाली.त्यांनी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना शह देऊन १५ पैकी १५ जागा जिंकल्या पण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास  आघाडीत फूट पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक झाली तर शिवसेना एकाकी पडली. ५ पैकी सेनेचे एक मत फुटले. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारड्यात मत टाकल्याने काँग्रेसचे बापूराव पाटील अध्यक्षपदी आणि राष्ट्रवादीचे मधुकर मोटे उपाध्यक्षपदी चार विरुद्ध ११ मतांनी विजयी झाले. सेनेचे संजय देशमुख आणि बळवंत तांबारे यांना प्रत्येकी चार मते पडली.सेनेच्या हातात शेवटी गोल भोपळा पडला.  

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार   प्रा. तानाजी सावंत आग्रही होते, कारण या दोघांची जिल्हा परिषदेत आघाडी आहे. पण डीसीसी बँकेची निवडणूक बिनविरोध काढण्यास शिवसेनेचे  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खोडा घातला. त्यामुळे दहा जागेसाठी निवडणूक झाली आणि दहाच्या दहा जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. पाच जागा बिनविरोध तर दहा जागा बहुमताने जिंकल्यामुळे खा. ओमराजे निंबाळकर किंकमेकर ठरले होते, पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. निवडणुक जिंकल्यानंतर जो गुलाल उधळला होता, तो आता सफेद झाला आहे. 

संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध निवडणूक काढण्यास खोडा घालणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा खोडा घातला. तिन्ही पक्षाला समान जागा मिळाल्याने तिन्ही पक्ष अध्यक्षपदावर दावा सांगू लागले, त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एकी झाली तर शिवसेना एकाकी पडली. इतकेच का तर शिवसेनेचे एक मत फुटले आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका बसला. 

जिल्हा परिषद आणि नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली असली तरी होऊ घातलेल्या  निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडी स्थापन  होणार आणि भाजपचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांची जिल्हा परिषदेवरील सत्ता उलथून टाकणार अशी चर्चा रंगली होती. पण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष / उपाध्यक्ष निवडणुकीचा अनुभव पाहता हे तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील असे वाटत नाही. कारण परंड्यात शिवसेनेचे आ. तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्यात आडवा विस्तव जात नाही. तसेच उमरग्यात शिवसेनेचे रवींद्र गायकवाड आणि काँग्रेसचे बसवराज पाटील यांच्यात  टोकाचे मतभेद आहेत. सर्वच तालुक्यात अशी परिस्थिती आहे. 


उस्मानाबाद डीसीसी बँकेच्या अध्यक्ष / उपाध्यक्ष निवडणुकीत  काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन शिवसनेच्या पाठीत जो सुरा खुपसला आहे त्याची आग पुढील सर्व निवडणुकीत धुमसत राहणार , हे नक्की. जिल्ह्याचे किंगमेकर शेवटी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोठे ठरले. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे टाँय-टाँय फिस झाले. 

- सुनील ढेपे , संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 


 

From around the web