धाराशिवला अद्यावत क्रीडा संकुल विकसित होणार

२५ कोटीचा पहिला टप्पा …- आ. राणाजगजीतसिंह पाटील
 
s

धाराशिव - येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या ठिकाणी जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करता यावी, यासाठी उच्च प्रतीच्या सोयी सुविधायुक्त भव्य व अद्यावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी पंधरा दिवसात प्राथमिक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिनांक 28 ऑगस्ट रोजी क्रीडा संकुला संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिल्या.

तुळजाभवानी स्टेडियमची अत्यंत दुरावस्था झाली असून या ठिकाणी शहराच्या वैभवात भर पाडणारे अद्यावत सोयी सुविधांसह नव्याने स्टेडियम उभारण्यात येणार आहे. वानखेडे व बालेवाडी सारख्या देशातील उत्कृष्ट क्रीडा संकुलाची उभारणी केलेल्या शशी प्रभू अँड असोसिएट्स चे इंजिनियर्स व आर्किटेक्ट्स लवकरच धाराशिवला येऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या क्रीडा संकुलाबाबत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री  संजय बनसोडे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी रु. 25 कोटी निधी देण्याचे मान्य केले आहे. उर्वरित आवश्यक निधीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी देखील त्यांच्या काही सूचना असल्यास त्या लेखी स्वरुपात जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे जमा करून पोहोच घ्यावी, योग्य सूचनांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.

धाराशिव शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी वेगाने काम सुरू असून नुकतेच रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी रुपये 21 कोटी, बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी रुपये 10 कोटी निधी मंजूर असून स्टेडियमचे देखील काम लवकरच मंजूर करून प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

s

सदरील बैठकीस जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम समिती डॉ. सचिन ओंबासे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. श्रीकांत हरनाळे, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद नितीन भोसले, कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण, मुख्याधिकारी न.प वसुधा फड, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन चे उपाध्यक्ष डॉ चंद्रजीत जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर, मा.उपनगराध्यक्ष अभय इंगळे, अभिजीत काकडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री अंकुश पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सौ रोहिणी आवारे, श्री मन्मथ आप्पा पाळणे, श्री प्रविण बागल, श्री कुलदीप सावंत, श्री प्रविण गडदे, श्री अजीम शेख, श्री जावेद शेख, श्री राजेश महाजन, श्री मनोज पतंगे, श्री सचिन पाळणे (वरील सर्व विविध जिल्हा क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी) जिल्हा क्रीडा अधिकारी श्री श्रीकांत हरनाळे, तालुका क्रीडा अधिकारी श्री कैलास लटके, संग्राम बनसोडे, मेसा जानराव यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थीत होते.

From around the web