तुळजाभवानी एक्सप्रेस अडीच वर्षात धावणार

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे  स्वप्न अखेर सत्यात उतरणार 
 
s
सांजा, वडगाव, तुळजापूरला नवे रेल्वेस्थानक

 सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. पहिल्या टप्प्यात धाराशिव-तुळजापूर या 30 किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी 544 कोटी रूपयांच्या कामाची निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. 30 महिन्यांच्या आत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा, वडगाव आणि तुळजापूर, असे तीन नवीन रेल्वेस्थानक उभारले जाणार आहेत. 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली होती. दिलेला शब्द खरा करून दाखवत तुळजाभवानी देवीच्या चरणी पंतप्रधान मोदी यांनी सेवा रूजू केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

ठाकरे सरकारच्या अनास्थे मुळे रखडलेल्या या रेल्वे मार्गाचे काम लवकर पुर्ण करण्यासाठी कामाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या 84 कि.मी लांबीच्या रेल्वेमार्गावर एकूण 110 पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील 32 गावांतील एक हजार 375 एकर जमीन त्यासाठी भूसंपादीत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. धाराशिव तालुक्यातील नऊ आणि तुळजापूर तालुक्यातील 15 गावांमधील 494.26 हेक्टर जमिनीचे भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या रेल्वेमार्गासाठी 452.46 कोटी रूपयांच्या निधीला तत्काळ मंजुरी देण्यात आली व पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यातील कामासाठी गुरूवार, 10 ऑगस्ट रोजी भारतीय रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत नवीन ब्रॉडगेज लाईन अंथरण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. 30 किलोमीटर अंतरासाठी 544 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत या निविदा स्वीकारल्या जाणार आहेत.

 महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत राज्य सरकारच्या हिश्श्यातील 50 टक्के निधी रखडला होता. त्यामुळे तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला जोडणार्‍या रेल्वेमागार्र्च्या कामाला उशीर झाला. ठाकरे सरकारच्या कालावधीत निधी उपलब्ध करून दिला असता तर तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला रेल्वेच्या नकाशावर येण्यासाठी एवढा विलंब लागला नसता, अशी प्रतिक्रियाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

तीन नवीन रेल्वेस्थानक

धाराशिव-तुळजापूर या 30 किलोमीटर रेल्वेमार्गावर तीन नवीन रेल्वेस्थानके उभारली जाणार आहेत. धाराशिव ते सांजा या 10 किलोमीटर अंतरावर सांजा येथे पहिले रेल्वे स्थानक असणार आहे. सांजा ते वडगाव या 12 किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर दुसरे रेल्वेस्थानक तर वडगाव ते तुळजापूर या आठ किलोमीटर अंतरावर तिसरे स्थानक उभारले जाणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण चार स्थानके असणार आहेत. त्यात धाराशिव येथील सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य रेल्वेस्थानकाचाही समावेश आहे. या मुख्य रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 21 कोटी रूपयांचा निधी सुपूर्द केला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

From around the web