पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा 

 
s

उस्मानाबाद - राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना या घटकाची अंमलबजावणी मार्गदर्शक सूचना 2021-22 नुसार खर्चाच्या मापदंडाच्या 50 टक्के देय अनुदानावर महाडीबीटी प्रणालीवर केली जात आहे.

        भाजीपाला पिकांची दर्जेदार आणि किडरोग मुक्त रोपे निर्मीती करुन उत्पन्न आणि उत्पादनात वाढ करणे, शेतीपुरक व्यवसायाची संधी आणि ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे आणि पीक रचनेत बदल घडवून आणणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

        राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना अंतर्गत राज्यात एकूण 822 भाजीपाला रोपवाटीकांची उभारणी करावयाची असून 23 कोटी 23 लाख रुपयांचा कार्यक्रम राबवावयाचा आहे. त्यासाठी प्रती रोपवाटीका प्रकल्प मुल्य 5 लाख 55 हजार रुपये ग्राह्य धरुन 2 लाख 78 हजार रुपये (50 टक्के याप्रमाणे) अनुदान देय आहे. यातील शेडनेट या घटकाला प्रकल्प मुल्य 3 लाख 80 हजार रुपयांच्या 50 टक्के रुक्कम 1 लाख 90 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येत होते.

       शेडनेट उभारणीकरिता लागणारे साहित्य, वेल्डींग, फॅब्रीकेशन, वाहतूक, मजुरी तसेच स्टीलच्या दरात वाढ झाल्याने शेडनेट या घटकाच्या प्रकल्प मुल्यात रक्कम 3 लाख 80 हजार रुपये मध्ये वाढ करुन 4 लाख 75 हजार रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वीचे अनुदान एक लाख 90 हजार रुपयांमध्ये 48 हजार रुपये इतकी वाढ करुन रक्कम 2 लाख 38 हजार रुपये इतके अनुदान शेडनेट या घटकाकरिता वाढविण्यात आले आहे. दि.22 ऑगस्ट 2022 पासून हे अनुदान पूर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना लागू राहील.

        जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना अंतर्गत भाजीपाला रोपवाटीकेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर यांनी केले आहे.

From around the web