उजनी धरणाचे पाणी कौडगाव धरणात येणार

धाराशिव  जिल्ह्याचा विकास पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसारखा करणार - प्रा. तानाजी सावंत 
 
s

धाराशिव  :- पुढच्या वर्षी मे 2024 पर्यंत उजनी धरणाचे पाणी कौडगाव धरणात येणार हे काम युद्ध पातळीवर सुरू असून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेबरोबरच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यासही याचा पाणी मिळणार आहे. या योजनेसाठी 11 हजार कोटी राज्य  शासनाने मंजूर केले असून या महत्वकांक्षी वॉटर ग्रीड योजनेमुळे बळीराजाला या उपक्रमातून दिलासा मिळेल असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज परांडा येथे केले. येथील गोपीनाथ मुंडे सभागृहात आयोजित ‘’शासन आपल्या दारी’’ या अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजा माने, उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, तहसीलदार रेणुका दास देवणीकर, गटविकास अधिकारी संतोष नाग टिळक, मुख्य अधिकारी मनीषा वडेपल्ली तसेच सर्व प्रमुख विभागातील कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, मी जलसंधारण मंत्री असताना कृष्णा व भीमाचं पाणी आपल्या जिल्ह्याला मिळावे यासाठी प्रयत्न केले. नीरा नदीचे पाणी उजनी धरणात आणून उजनीच पाणी कौडगाव येथे येणार असून कृष्णा भीमा निरा कौडगाव या वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामामुळे आठ जिल्ह्यातील 11 धरण जोडले जाणार आहे. या कामासाठी मंत्रिमंडळाने 35 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे मराठवाडयाचा पाण्याचा प्रश्‍न सुटेल तसेच मोठया प्रमाणात सिंचन क्षेत्र ओलिताखाली येईल.

राज्य शासनाने लोक उद्धाराच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत तसेच आणखीन योजना आखण्यात येत आहेत, महाराष्ट्रातील जनतेला तसेच प्रत्येक समाजातील नागरिकांना समान न्याय, सहकार्य देण्याची शासनाची भुमीका आहे, लोकांच्या उद्धारासाठी हे शासन अहोरात्र प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.

उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसारखा करण्याचे मी शब्द देतो याचाच भाग म्हणून भुम, परांडा व वाशी या तालुक्यातील पाणीपुरवठा आणि रस्ते विकासासाठी 1200 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हे तीनही तालुके जिल्ह्यातील सर्वात सुंदर आणि सर्व सोयींनी युक्त होणार अशी मी ग्वाही देतो असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी पालकमंत्र्यांनी सभागृहाच्या परिसरात मांडण्यात आलेल्या वेगवेगळ्या विभागांच्या स्टॉल्सवर भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली येणाऱ्या नागरिकांना प्रत्येक योजनेचा पुरेपूर लाभ मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, आलेल्या नागरिकांना योजनेची माहिती द्यावी त्यांना येणाऱ्या अडचणींना सोडविण्याचे प्रयत्न करावे असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

भुम येथे शासन आपल्या दारी या योजनेच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री म्हणाले की शासन योजना आखण्याचे काम करते तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते परंतु विविध योजना वेगवेगळ्या कार्यालया मार्फत राबविल्या जातात त्या एका ठिकाणी उपलब्ध होत नाही म्हणून शासन आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत जनतेपर्यंत प्रत्येक योजना व त्या योजनेशी संबंधित कार्यालय एकाच ठिकाणी आणून नागरिकांना याचा लाभ देण्याचे या योजने मागचे उद्दिष्ट आहे असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगीतले. नुकतेच भुम नगरपरिषदेला 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील विकासकामे अतिशय उत्तम दर्जाचा करून देशातील उत्कृष्ट नगरपालिकांच्या यादीत भूम नगरपालिकेच्या समावेश होईल अशी मला आशा आहे असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

डॉ.तानाजी सावंत पुढे म्हणाले की, परांडा, भूम आणि वाशी या ठिकाणी अलीकडेच जनता दरबार आयोजित करून सर्वसामान्य माणसाला त्यांच्या तक्रारी मांडण्याची संधी देऊन प्रत्यक्ष त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. यापुढेही अशा प्रकारचे जनता दरबार आणि शासन आपल्या दारी राबविल्या जातील तेव्हा नागरिकांनी अशा संधीचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी यावेळी केले.

वाशी येथे बोलतांना पालकमंत्री म्हणाले गेल्या एक वर्षापासून राज्य शासनाने योजना जनतेच्या हिताच्या अनेक योजनांना मंजुरी दिली आहे, निर्णयांच्या गतीमाणतेमुळे महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक नागरिकापर्यंत त्याला आवश्यक असलेली योजना त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी शासन आपल्या दारी या मोहिमेची सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेऊन सामान्य नागरिकांना सोयी सुविधा आणि सवलती उपलब्ध करून देण्याच्या निर्धार केला आहे . याचाच एक भाग म्हणून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, 75 वर्ष वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास, राज्यातील एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 12000 कोटी नुकसान भरपाई देण्यात आली, एन डी आर एफ चे निकष दुप्पट करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला, तसेच सिबिल च्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरुद्ध एफ आय आर नोंदविण्याची सूचनाही केली आहे. पीक कर्ज न देणाऱ्या बँकांविरुद्ध शेतकऱ्यांनी तक्रार करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत म्हणाले भूम, परांडा, वाशी येथील रस्त्यांच्या कामांसाठी 154 कोटी पेक्षा जास्त निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे, तसेच  तालुक्याच्या पाणीपुरवठा साठी एकूण 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 शेतकऱ्यांना एक रुपया भरुन पिक विमा देण्याबाबत मंत्रीमंडळात निर्णय झालेला आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील चार कोटी 39 लाख माता भगिनींचं मोफत उपचार करण्यात आला आहे.तसेच योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र व धनादेश वाटप करण्यात आले. या शासनाने अनेक लोकोपयोगी योजनांचे आखणी केली असून भविष्यातही नागरिकांना वेगवेगळे योजनांचा लाभ दिला जाणार असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगीतले.. या तीनही कार्यक्रमात सर्व विभागामार्फत मंजुर लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व धनादेश पालकमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी नागरिकांनी कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत अभुतपूर्व सहभाग नोंदविला.

पालकमंत्री सावंत यांनी केली परंडा किल्ल्याची पाहणी

s

परांडा येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे शुभारंभ झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी परंडा येथील किल्ल्याची पाहणी केली यावेळी त्यांचे सोबत प्रसिद्ध मुख्याधिकारी उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थित होते. पाहणी दरम्यान उपस्थीत अधिकाऱ्यांना सुचना देतांना पालकमंत्री म्हणाले की, किल्लयाच्या परिसरात दर्शनी भागात सी.सी.टी.व्ही बसविण्यात यावे. तसेच किल्लयाच्या भोवती असलेल्या तलावाची स्वच्छता करुन त्याचे खोलीकरण करुन या ठिकाणी बोटींगची सुविधा उपलब्ध करावी जेणेकरुन पर्यटनास प्रोत्साहन मिळेल असेही पालकमंत्री महोदयांनी सांगीतले.

गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मोहीम पालकमंत्री यांनी हाती घेतली असून गेल्या काही दिवसांपूर्वी या किल्ल्याची साफसफाई करण्याचे व सुशोभीकरण करण्याबाबत पालकमंत्री महोदयांनी आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला.

From around the web