उस्मानाबादच्या समांतर पाणी पुरवठा योजनेस चालना देणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

 
उस्मानाबादच्या समांतर पाणी पुरवठा योजनेस चालना देणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

उस्मानाबाद - जिल्ह्यात सातत्याने पडणारा दुष्काळ, जिल्ह्यातील पाण्याच्या स्त्रोतांची कमी असलेली क्षमता आणि शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहरातील नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून शहराच्या समांतर पाणी पुरवठा योजनेस चालना देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.   

         उस्मानाबाद नगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या केंद्रशासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत शहर पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळयात श्री.शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जि.प.च्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, आमदार कैलास पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जि.प.चे उपाध्यक्ष धनंजय सावंत आदी उपस्थित होते.

          या योजनेमुळे शहरातील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने चांगले काम केले आहे. हे काम वेळेत पूर्ण झाल्याने नागरिकांना या योजनेचा लाभ होईल, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, या योजनेमुळे उजनी प्रकल्पातून मंजूर केलेल्या 6.63 दशलक्ष घनमीटर पाणी उचलले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना दरडोई दरदिवशी 135 लिटर पाणी पुरवठा केला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

          आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पाणीटंचाई, भुयारी गटार योजना, रस्ते यासारख्या विविध योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, शहरातील 168 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या टप्प्यावर आहे. समांतर योजनेचा प्रस्ताव आल्यास त्याचाही सकारात्मक विचार करु, त्याला चालना देऊ, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना, अतिवृष्टीसारख्या संकटाच्या काळातही राज्यातील जनतेच्या हितांचे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली. कोवीडच्या काळात जनतेच्या आरोग्याचे रक्षण केले. मी मुद्दाम नगरविकास विभागाने घेतलेल्या चांगल्या निर्णयाची माहिती जनतेला द्यावी आणि अधिकाऱ्यांनी त्या निर्णयांची अंमलबजावणी करुन हे निर्णय जनतेपर्यंत घेऊन जावेत म्हणून आलो आहे. आपल्या सगळया मागण्या राज्याचे

महाविकास आघाडीचे सरकार सकारात्मक रितीने प्रश्न सोडविल्याशिवाय राहणार नाही. आपले अनेक वर्षांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न आमच्या आघाडी सरकारने पूर्ण केले तसेच इतरही कामे केले जातील, असा विश्वासही नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिला.

          जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच नगरविकास विभागाचे मंत्री आणि सचिव जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडविण्याचे काम करीत आहेत, ही अपूर्व अशी घटना आहे, असे सांगून खासदार राजेनिंबाळकर म्हणाले की, 1992 मध्येच उस्मानाबादची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले असते पण ते दुसरीकडेच पळविले गेले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आमचेही वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण केले आहे. शहरात मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल नसल्याने लातूर-सोलापूरला जावे लागत होते. प्रथम या महाविद्यालयाचा ‘पीपी’ प्रस्ताव होता पण, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पूर्णत: शासनच  हे महाविद्यालय उभारेल, असे सांगितले आहे. जिल्ह्यातील सर्वच न.पा.ना निधी कमी पडतोय म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहेत. आपण या अपेक्षा नक्कीच पूर्ण करणार असा आम्हाला विश्वास आहे. नगराध्यक्षांनी केलेल्या मागण्याही मंजूर केल्या जातील, असेही खासदार म्हणाले.

          यावेळी आमदार कैलास पाटील यांचेही भाषण झाले, नगराध्यक्ष निंबाळकर यांनी पुढील 2050 पर्यंतच्या शहराच्या पिण्याच्या पाण्याचा विचार करुन उजनीतून संपूर्ण पाणी मिळण्याची योजना मंजूर करावी, भुयारी गटार योजनेस लवकर मंजुरी द्यावी, अपूर्ण नाट्यगृहाच्या कामास मदत करावी, भोगावती नदीच्या सुशोभीकरणास मदत करावी, रिक्त पदे भरण्यात यावीत, शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवावा आदी मागण्या केल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडला. नपाचे मुख्याधिकारी श्री.येलगटे यांनी आभार मानले.

From around the web