उस्मानाबादच्या आनंदनगर पोलिसांचा तालिबानी कारभार ( Video )

पान देण्यास उशीर केला म्हणून टपरी चालकाच्या मित्रास रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण 
 
s

उस्मानाबाद - उस्मानाबादच्या आनंदनगर पोलिसांचा तालिबानी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पान देण्यास उशीर केला म्हणून टपरी चालकाच्या मित्रास पोलीस स्टेशनमध्ये नेवून रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केल्याने हे महाराष्ट्र  पोलीस आहेत की तालिबानी ? असा प्रश्न उस्मानाबादकरांना पडला आहे. 

शहरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका पान टपरीवर शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फरीद शेख ( वय २६, रा. समर्थनगर )  हा तरुण उभारला होता. यावेळी आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण आणि त्यांचा चालक पठाण आले आणि त्यांनी  टपरी चालकास पान-सुपारीची मागणी केली 

यावेळी अन्य दोन ग्राहक उभारले होते. पान टपरी चालकास पान देण्यास उशीर झाल्याने पोलीस निरीक्षक चव्हाण यांचा चालक मुक्रम पठाण याने ' तुला साहेब दिसत नाहीत का ? तुला पोलिसांचा इंगा दाखविला पाहिजे असे म्हणून अश्लील शिवीगाळ सुरु केली. 

यावेळी टपरी चालकाचा मित्र फरीद शेख याने पठाण यास शिवीगाळ करू नका म्हणून मध्यस्थी केली असता, तू मध्ये पडू नको म्हणून पठाण याने त्यासही शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर त्याने पोलीस गाडीत बस म्हणून जबरदस्तीने गाडीत बसविले आणि आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये नेले. 

आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक चव्हाण,  मुक्रम पठाण आणि अन्य दोन पोलिसांनी फरीद शेख  यास लाथाबुक्यांनी आणि बेल्स्टने डोक्यावर आणि हातापायावर रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली. 

s

फरीद शेख यास बेदम मारहाण झाल्याचे समजताच, मुस्लिम समाजातील अनेक  लोक आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले., त्यांनी पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन आणि डीवायएसपी मोतीचंद  राठोड यांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. 

त्यानंतर फरीद शेख यास उपचारासाठी उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त केला जात असून, आनंदनगर पोलिसांच्या  तालिबानी कारभाराबाबदल निषेध व्यक्त केला जात आहे. 

गंभीर बाब म्हणजे पोलीस निरीक्षक चव्हाण यांचा चालक मुक्रम पठाण हा रजेवर असतानाही पोलीस गाडी चालवीत होता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

याप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करून घेणार का ? मारहाण करणाऱ्या पोलिसांवर पोलीस अधीक्षक कारवाई करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. 

Video


 

From around the web