उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी संबंधित खात्याचे मंत्री,लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची व्हर्च्युअल बैठक घ्या...

 
आ.राणाजगजीतसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी संबंधित खात्याचे मंत्री,लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची व्हर्च्युअल बैठक घ्या...


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्याने शिवसेनेला भरभरून दिले आहे.आपण राज्याचे प्रमुख झाल्याने जिल्हावासीयांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत.जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प,कौडगाव येथे देशातील पहिला टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारणे,कौडगाव येथे २५० मेगावॅट चा हायब्रीड सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे,सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  संबंधित खात्याचे मंत्री,जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सचिव यांची व्हर्च्युअल बैठक घ्यावी व हे सर्व विषय मार्गी लावण्यासाठी कालबध्द कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी आ.राणा जगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


आमदार पाटील यांनी आपल्या पत्रात  उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेने कायम शिवसेनाला भरभरून दिले असल्याचे सांगत  उस्मानाबाद-कळंब,उमरगा व भूम परंडा या विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे २० वर्ष,१० वर्ष,२० वर्ष आमदार  तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही जागी शिवसेनेचे आमदार निवडून दिले असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात देखील ५ वेळा शिवसेनेचे खासदार निवडून दिले असल्याने शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून या भागातील जनतेच्या आपल्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळी तर जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षांत अजून भर पडली आणि या जिल्ह्यातील सामान्य नागरिक आपण शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत असल्याने व थेट पक्षप्रमुखच राज्याचे प्रमुख बनले असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच कांही तरी ठोस निर्णय होतील या भावनेने आपल्याकडे मोठ्या आशेने पाहू लागला असल्याचे आ.पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.


उस्मानाबाद जिल्हा हा भौगोलिक रचनेमुळे कायम दुष्काळाच्या छायेत येतो परिणामी वाट्याला सतत दुष्काळी परिस्थिती असते.त्यातच शेती हेच एकमेव उत्पन्नाचे साधन असल्याने जिल्ह्यातील शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो.नीती आयोगाने उस्मानाबाद आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केला आहे.जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी औद्योगिकीकरणाला चालना देणे व सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करून देणे हाच एकमेव उपाय असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले आहे.

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाला भरीव निधी मिळावा यासाठी त्याचा नॅशनल इन्फ्रा पाईप लाईन प्रकल्पात समावेश होण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करणे,उस्मानाबाद शहरालगत असलेल्या कौडगाव औद्योगिक वसाहतीत उद्योग यावे यासाठी उद्योगांना विशेष सवलती देण्याबाबत धोरण आखणे व त्याची अंमलबजावणी करणे,कौडगाव येथे देशातील पहिला टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारणे,कौडगाव येथे २५० मेगावॅट चा हायब्रीड सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे,सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा अर्धा खर्च महाराष्ट्र शासनाने उचलणे,उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणे यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे.मात्र अद्याप याबाबत शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत आ.पाटील यांनी व्यक्त केली आहे.

दि.२३ जुलै रोजी उस्मानाबाद स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्राचे व्हर्च्युअल लोकार्पण केले आहे.अशातच अकोला-वाशीम-बुलढाणा या जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा देखील व्हर्चुअल बैठकीद्वारे घेतला आहे त्याच पद्धतीने उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आपण खालील महत्वाच्या विषयांच्या अनुषंगाने संबंधित खात्याचे मंत्री,जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व सचिव व वरिष्ठ अधिकारी यांची व्हर्च्युअल बैठक घ्यावी व हे सर्व  प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वाकडे जावेत यासाठी कालबध्द कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आ.पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

From around the web