उस्मानाबाद न.प. - ४० कोटीच्या ५४ कामाची निविदा अखेर रद्द
उस्मानाबाद - उस्मानाबाद नगर पालिकेच्या वतीने बांधकाम विभागाच्या एकूण ५४ कामाची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना मोठा दणका बसला आहे.
उस्मानाबाद नगर पालिकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर शहरातील विविध प्रभागात रस्त्याची आणि नाल्याची ५४ कामे काढण्यात आली असून त्याचा एकूण अंदाजित खर्च ४० कोटी आहे.
ही कामे सुरु करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्याकडून प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक होते. प्रशासकीय मान्यता घेतल्याशिवाय बजेट मिळत नाही. मात्र प्रशासकीय मान्यता न घेताच या ५४ कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.
जर ही कामे मर्जीतील कंत्राटदारांना मिळाली तर प्रशासकीय मान्यता घ्यायची आणि इतर कंत्राटदारांना कामे मिळाली की बिले अडकावयाचे असा फ़ंडा नगराध्यक्ष मकरंदराजे यांचा होता, असा आरोप केला जातोय.
२० आणि २१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली निविदा रद्द करावी, अशी मागणी नाराज असलेल्या जिल्ह्यातील एका शिवसेनेच्या आमदाराने , एक भाजप आमदाराने आणि माजी उपनगराध्यक्ष सूरज साळुंके, नगरसेवक उदय निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार नगर पालिका मुख्याधिकाऱ्यानी ४० कोटीची ५४ कामाची निविदा अखेर रद्द केली आहे.
निविदा रद्द करण्यात आल्यामुळे शिवसेनेचे विद्यमान नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना दणका बसला आहे. याबाबत नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना विचारले असता, योग्य वेळी पत्रकार परिषद घेऊन सर्व बाबींचा खुलासा करू, असे सांगितले.