भोसले हायस्कुलच्या प्रांगणातील गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा अनधिकृत 

महसूलमंत्र्याच्या आदेशाला देखील केराची टोपली 
 
putala
हा घ्या पुरावा 

धाराशिव -  शहरातील भोसले हायस्कुलच्या प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हा शासनाची मान्यता न घेताच शासनाच्या जागेत उभा करण्यात आलेला आहे. तसेच जागेबाबत  महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,  पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी कार्यक्रमास ऐनवेळी दांडी मारल्याचे समोर आले आहे. 

पालकमंत्री तानाजी सावंत हे सोमवारी धाराशिव शहरात आले होते, त्यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली पण भोसले हायस्कूलच्या कार्यक्रमाकडे शहरात असूनही फिरकले नाहीत.त्यांनी ऐनवेळी पाठ का फिरवली, याची उलटसुलट चर्चा सुरू होती. ते कार्यक्रमाकडे का फिरकले नाहीत, याचा पुरावाच धाराशिव लाइव्हच्या हाती लागली आहे. 

s

 श्रीपतराव भोसले हायस्कुल ही धाराशिव शहरात नामवंत शाळा म्हणून ओळखली जाते, येथे शिकलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर,वकील, शासकीय अधिकारी झाले आहेत,ही वस्तुस्थिती आहे . माजी मुख्याध्यापक गुरुवर्य के. टी. पाटील हे आदर्श व्यक्ती होते, हेही खरे आहे. पण त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करताना  शासनाची कसलीही मान्यता घेण्यात आली नाही.. क्रीडांगणासाठी शासनाने दिलेल्या जागेवर जशी बेकायदा इमारत उभी करण्यात आली, तसेच पुतळा देखील अनधिकृत उभा करण्यात आला आहे. 

भोसले हायस्कूल संस्थेला समोरील  मैदान शासनाने विद्यार्थांसाठी क्रीडांगणासाठी दिले असताना, त्यावर शाळेची अनधिकृत बिल्डिंग उभी करण्यात आली, त्याविरुद्ध तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी भोसले हायस्कूलविरुद्ध निकाल दिला होता, ही जागा शासनाची जागा असल्याचा निर्वाळा दिला होता.त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नागरगोजे यांनी शाळेचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश नगर परिषदेला दिले होते. त्यानंतर सुधीर पाटील यांनी महसूल मंत्र्याकडे धाव घेतली असता, अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम आणि त्यावरील व्याज भरण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला देखील सुधीर पाटील यांनी केराची टोपली दाखवली आहे. 

शासकीय जागेवर अनधिकृत पुतळा उभा करण्यात आल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमास दांडी मारली तर पालकमंत्री तानाजी सावंत धाराशिवमध्ये असूनही फिरकले नाहीत, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, मंत्री संजय बनसोडे, प्रवीण दरेकर, आ. सुरेश  धस, बार्शीचे आ. राजाभाऊ राऊत, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ.सुभाष देशमुख हेही गैरहजर होते.तसेच जे पाहुणे आले तेही पुतळाकडे गेलेच नाहीत. केवळ पुतळा अनधिकृत असल्याने सुधीर पाटील यांनी गाजावाजा करून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा फियास्को झाला. 

s

एकीकडे मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना, स्वतःला मराठा समाजाचे कैवारी समजले जाणारे शिक्षण सम्राट सुधीर पाटील यांनी याच कार्यक्रमात  सोनी टिव्ही वरील कलाकारांचा हास्य जत्रा कार्यक्रम ठेवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला होता. हा कार्यक्रम देखील टाळायला हवा होता. त्यामुळे टीकेत आणखी भर पडली. 

अडीच कोटी जमा , खर्च किती ? 

गुरुवर्य के. टी. पाटील  यांचा पुतळा उभा करण्याच्या नावाखाली अडीच कोटी जमा करण्यात आले. कार्यक्रमाचा खर्च फार तर दीड कोटी झाला आहे. एक कोटी आता कुणाच्या घश्यात गेले ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

शाळेतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक, अन्य संस्थेचे प्राध्यापक , गावातील दानशूर व्यक्ती यांच्याकडुन हा निधी गोळा करण्यात आला.  शिक्षक आणि प्राध्यापक यांना सक्ती करण्यात आली. गरीब विद्यार्थांकडून देखील सक्तीने वर्गणी घेण्यात आली. गुरुवर्य के. टी. पाटील  यांचा पुतळा उभा करून, सुधीर पाटील यांनी कोणता आदर्श घेतला ? याची चर्चा सुरु आहे. 
 

From around the web