नागरी समस्यांकडे धाराशिव नगर परिषदेची डोळेझाक

 शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा मुख्याधिकार्‍यांना इशारा
 
s

धाराशिव - शहरातील विविध नागरी समस्यांकडे नगर परिषद प्रशासन डोळेझाक करत असल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. शहरातील कचरा, रस्त्यावरील खड्डे व इतर समस्यांची येत्या पाच दिवसांत सोडवणूक न झाल्यास शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने नगर परिषद प्रशसानाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नपचे माजी गटनेते सोमनाथ गुरव यांनी दिला आहे.

याबाबत मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, धाराशिव नगर परिषदेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकराज आहे. मात्र शहरातील मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील अनेक भागात नाल्यांची स्वच्छता दोन-दोन महिने केली जात नाही. त्यामुळे नाल्या तुंबून घाण पाणी रस्त्यावर येत आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने या घाणीमुळे शहरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही भागात तर नागरिक स्वतःच्या हाताने नाल्यांची स्वच्छता करत आहेत. ही बाब पालिकेच्या दृष्टीने लाजिरवाणी आहे. अनेक भागात कचरा घेऊन जाणार्‍या घंटागाड्या दोन-दोन महिने फिरकत नसल्याने शहरातील विविध भागात कचर्‍याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे अनेक भागात कचर्‍याचे ढीग साचले आहेत.

नगर परिषदेचे जवळपास 20 सफाई कर्मचारी शासनाच्या व इतर विभागातील अधिकार्‍यांकडे काम करतात. अशा कर्मचार्‍यांना पुन्हा पालिकेत परत घेऊन त्यांच्यामार्फत सफाईची कामे करून घ्यावीत.  त्याचबरोबर शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालताना, वाहने घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातील रस्तेकामांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे. परंतु शिंदे-फडणवीस सरकारच्या दबावापोटी नगर परिषद प्रशासकाकडून रस्त्याची मंजूर कामे करण्यास टाळाटाळ केली जात असून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. नागरी समस्या दूर करून जनतेच्या समस्या दूर कराव्यात. येत्या पाच दिवसांत नाल्यांची स्वच्छता करून कचर्‍याचे ढीग उचलण्यात यावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनावर शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, हनुमंत देवकते, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, रवि वाघमारे, पंकज पाटील, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, गिरीष पाळणे,  शिवप्रताप कोळी,  सुरेश गवळी, सतीश लोंढे, नीलेश साळुंके, नीलेश शिंदे, शिवयोगी चपणे व इतर शिवसैनिकांची स्वाक्षरी आहे.

From around the web