कोरोना : उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील ३५ फ्लोअर बेड शिल्लक

शिवसेनेच्या आणि तेरणा ट्रस्टच्या कोव्हीड सेंटरमधीलही  बेड शिल्लक 
 
कोरोना : उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील ३५ फ्लोअर बेड शिल्लक

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेली कोरोनाची लाट अंशतः  कमी झाली आहे.  जिल्हा रुग्णालयामधील 35 फ्लोअर बेड शिल्लक असल्याचे पहिल्यांदा दिसत आहे.  या शिवाय शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने सव्वाशे बेडचे व तेरणा ट्रस्टचे 25 बेडचे कोवीड सेंटर देखील सूरु झाले आहेत. साहजिकच त्याठिकाणीही बेड उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे कोरोना झाल्यानंतर बेडसाठी दाही  दिशा फिरणाऱ्या कोरोना रुग्णांना थोडासा दिलासा मिळाला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. दररोज ७०० पेक्षा जास्त रुग्ण पॉजिटीव्ह येत होते. मृत्यूचे प्रमाण २० पेक्षा जास्त गेले होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून मृत्यूच्या प्रमाणात देखील थोडीशी घट  झाली आहे. २७ एप्रिल ( मंगळवार ) रोजी पाच आणि २८ एप्रिल ( बुधवार ) रोजी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. 

 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या उस्मानाबाद शहर व तालुक्यामध्ये आढळत होते, मात्र त्याचे लोण आता ग्रामीण भागामध्येही पोहचले आहे. पण दरम्यानच्या काळात शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांची अलोट गर्दी झाल्याचे चित्र होते. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक रुग्ण एकावेळी उपचार घेत असल्याचे चित्र होते. यामुळे शहरात रिकामा बेड मिळणे सुध्दा अवगड झाले होते. रुग्णांचे बरे होण्याचे 81 टक्केच्या जवळपास गेले आहे, त्यामुळे गंभीर रुग्ण वगळता सामान्य व ऑक्सीजन वरील रुग्ण बरे होऊन क्वारंटाईन सेंटरमध्ये जात आहेत.

सध्या फक्त व्हेंटीलेटर बेडच्या बाबतीत अजूनही अडचणी असून त्या ठिकाणी अतिगंभीर रुग्णांवर उपचार सूरु असल्याचे चित्र आहे.मधल्या काळात ऑक्सीजनचा बेडसह साधा बेड मिळणेही शक्य नसल्याची परिस्थिती होती.आता हळुहळु परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ लागली आहे. आजच्या दिवशीचा आढावा घेतला तर तपासणीसाठी किंवा दाखल होण्यासाठी फारशी गर्दी पाहयला मिळालेली नाही. नवीन रुग्णांची भरती होत नसल्याने बेड सुध्दा शिल्लक राहिले आहेत. फ्लोअर बेडमधील 35 जागा शिल्लक असून नेत्र रुग्णालयामध्येही जागा मिळू शकते अशी स्थिती आहे.

शिवाय शिवसेनेच्यावतीने सूरु केलेले सव्वाशे बेडचे जंम्बो कोवीड सेंटरही सूरु झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे काही दिवसात शक्य होईल असे चित्र आहे. दररोज बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. मृत्यु होणाऱ्या लोकांचा आढावा घेतल्यास रुग्ण दाखल झाल्यापासुन 72 तासामध्ये मृत्यु झालेल्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे अंगावर काढणे हा मोठा धोका असुन त्याचा विचार करुन नागरीकांनी अधिक जागरुकता दाखविणे आवश्यक असल्याचे बाब अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सचिन देशमुख यांनी सांगितले.

From around the web