धाराशिव नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम
धाराशिव - नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे करणाऱ्या व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्याधिकारी वसुधा फड यांनी, स्वच्छता विभागाचे लिपिक गोरख रणखांब यांना २३ ऑगस्ट रोजी दिला आहे.
मुख्याधिकारी यांच्या आदेशानंतर स्वच्छता विभागाचे लिपिक गोरख रणखांब हे शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेले असता, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. चौकशी करून गुन्हा दाखल करू, असे पोलिसांनी सांगितल्याचे रणखांब यांनी सांगितले. आज १४ दिवस झाले तरी बांगड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या म्हणण्यानुसार जागा व्यापारी रामचंद्र बांगड यांची आहे , फक्त बांधकाम परवाना घेतला नाही. त्यामुळे चौकशी करून गुन्हा दाखल करतो , असे त्यांनी म्हटल्याचेही रणखांब यांनी सांगितले. परंतु पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल न करता, चौकशी कशी होते ? त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास नेमकं कोण टाळाटाळ करतंय असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे,
काय आहे प्रकरण ?
तुळजापूर रोडवरील जनता बँकेसमोर ( सर्व्हे नंबर २४० ) मध्ये व्यापारी रामचंद्र बांगड यांनी नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे केले आहेत.
नगर पालिकेची जागा असताना, बांगड यांनी नगर पालिकेकडून बांधकाम परवाना न घेता, मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे करत असताना त्यांना नोटीसा देऊनही त्यांनी बांधकाम न थांबवल्याने बांगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्याधिकारी वसुधा फड यांनी, स्वच्छता विभागाचे लिपिक गोरख रणखांब यांना २३ ऑगस्ट रोजी दिला आहे. परंतु नंतर खिसा गरम झाल्यानंतर त्यांनी चुप्पी साधल्याचे कळते. त्यामुळे आजमितीस १४ दिवस झाले तरी बांगड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. बांगड यांनी पोलीस आणि मुख्याधिकारी वसुधा फड यांना मॅनेज करून आपले बांधकाम सुरूच ठेवले आहे. ते रोखण्याची धमक पालिका अधिकाऱ्याकडे नाही, हे दिसून येत आहे,
नेमके पाणी कुठं मुरतंय ?
पोलीस म्हणतात, आमच्याकडे तक्रार आलीच नाही तर गुन्हा कसा दाखल करणार ? स्वच्छता विभागाचे लिपिक गोरख रणखांब म्हणतात पोलीस गुन्हा दाखल करीत नाहीत. त्यामुळे पाणी नेमकं कुठं मुरतंय ? असा प्रश्न पडला आहे. मुख्याधिकारी वसुधा फड यांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश काढला असला तरी हा आदेश फक्त दिखाऊ आहे. फड यांनी वाहत्या पाण्यात हात धुवून घेतल्याचे कळते. बांगड प्रकरणात नेमके कोण आणि किती लाखात मालामाल झाले ? याची चविष्ट चर्चा नगर पालिका आवारात सुरु आहे,
धाराशिव शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहेत, इतकेच काय तर अतिक्रमण जागेवर बांधकाम करून ते भाड्याने दिले जात आहेत आणि पालिका अधिकारी पैसे खाऊन गप्प आहेत.
जागा नेमकी कोणाची ?
धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ प्रवीण गेडाम यांनी बांगड यांच्या जागेचे प्रकरण बाहेर काढले होते त्यावेळी ही जागा शासकीय असल्याचे समोर आले मात्र त्यानंतर महसूलच्या अधिकऱ्यानी हात ओले करून बांगड यांच्या बाजूला निकाल दिला होता. नंतर नगरपालिका न्यायालयात खेटे मारून, पुन्हा नगरपालिकेच्या नावावर ही जागा केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर जनता बँकेच्या समोर मोक्याच्या ठिकाणी ही जागा असुन ती हडप करण्याचा घाट रचला गेला असून जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी या प्रकरणी लक्ष देण्याची गरज आहे.