धाराशिवच्या वैभवात पडणार भर भव्य व आधुनिक बसस्थानक साकारणार

⁃  आमदार राणाजगजितसिंह पाटील
 
sd

धाराशिव  -  शंभर दुकानगाळ्यांसह मोठे हॉटेल असलेले भव्य व्यापारी संकुल, कर्मचार्‍यांसाठी सुसज्ज निवासस्थाने, प्रशस्त उपहारगृह, प्रवासी, चालक-वाहक विश्रांती कक्ष आणि तब्बल 22 फलाट (प्लॅटफॉर्म) असलेल्या धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सौंदर्यात भर टाकणारे हे राज्यातील सर्वात सुंदर बसस्थानक ठरावे, यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या सूचना व संकल्पना जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

s

‘गोरोबा काकांची भक्ती आणि तुळजाभवानी देवीची शक्ती’, असा भक्ती आणि शक्तीपीठाचा अनोखा संयोग असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब बसस्थानकाच्या इमारतीत साकारले जाणार आहे. वास्तुविशारद श्री अजय ठाकुर यांना तशा पध्दतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील आठवड्यात मध्यवर्ती बसस्थानकाचे प्राथमिक संकल्पचित्र प्रकाशित करण्यात आले होते. आता या संपूर्ण परिसरावर साकारल्या जाणार्‍या अत्याधुनिक मध्यवर्ती बसस्थानकाचा सुधारीत ले-आऊट प्लॅन तयार करण्यात आला आहे. या सुधारीत आराखड्यातही जिल्ह्याच्या सौंदर्यात भर टाकणारे काही महत्वपूर्ण बदल सूचविण्यात येणार आहेत. बसस्थानकाची जागा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने शहर आणि जिल्ह्याच्या सौंदर्यात नवीन बसस्थानकाच्या इमारतीमुळे भर पडणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.

बस डेपोचेही नुतनीकरण

उपलब्ध असलेल्या तीन हेक्टर जागेवर सर्व सोयी-सुविधांनीयुक्त असे मध्यवर्ती बसस्थानकासह अन्य बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. वाहनतळ, प्रवासी कक्ष, प्रशस्त उपहारगृह, पार्सल विभाग, प्रतिक्षालय, जेनेरिक औषधालय, चालक-वाहक विश्रांतीगृह, कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने आणि इतर अनुषंगीक आधुनिक सोयी-सुविधांचा यात समावेश असणार आहे. 22 फलाट असलेल्या या नवीन बसस्थानकाला जोडूनच असलेल्या बसडेपोचेही नुतनीकरण करण्यात येणार आहे.

नागरिकांच्या लेखी सूचना व संकल्पनांचे स्वागत

एकाच वेळी 22 बसगाड्या थांबू शकतील, अशा भव्य बसस्थानकाच्या इमारतीवर स्थानिक गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीचे प्रतिबिंब साकारण्याचा मानस आहे. त्याअनुषंगाने जिल्हाभरातील नागरिकांनी त्यांच्या सूचना आणि अभिनव संकल्पना राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयात जमा कराव्यात. नागरिकांच्या योग्य सूचना व अभिनव संकल्पनांचा या आराखड्यात नक्की समावेश केला जाईल. त्यासाठी 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सायंकाळी 5 वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

From around the web