उस्मानाबादेत निर्जळी .... साडेसहा कोटींची थकबाकी, तिन्ही पंपहाऊसची वीज बंद... 

 
as

उस्मानाबाद शहरात मागील चार ते पाच दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. वीज बिल थकल्याने नगरपालिकेच्या तिन्ही पंपहाऊसची वीज महावितरणने खंडीत केली आहे. त्यामुळे शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली आहे.  पालिकेच्या तिजाेरीत खडखडाट असल्याने पाणी पुरवठा सुरळीत  कधी  होणार ? हे एक कोडेच आहे. 


उस्मानाबाद नगरपालिकडे महावितरणची साडेसहा कोटी थकबाकी थकली आहे. त्यामुळे महावितरणने चार दिवसापूर्वी  तेरणा, रुईभर आणि उजनी या तिन्ही पंप हाऊसचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून,  अभूतपूर्व अशी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 


उस्मानाबाद शहरात विविध भागात चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. त्यात भानूनगर, शाहूनगर आदी  भागात आठ दिवसापासून नळाला पाणी आलेले नाही. चार दिवसांतरही पाणी न आल्याने नागरिकांनी चौकशी केली तर पंपहाऊसची वीज महावितरणने खंडीत केल्याचे त्यांना समजले. 

महाराष्ट्र शासनाकडे १५ व्या वित्त आयोगातून उस्मानाबाद नगर पालिकेला दर तीन महिन्याला मिळणारा निधी मागील वर्षभरापासून मिळालेला नाही. शासनाकडे साडेआठ कोटी रुपये येणे बाकी  आहे, त्यामुळे वीज बिल भरणे शक्य झाले नाही, असे पाणी पुरवठा ( विद्युत  ) अभियंता गडे  यांनी सांगितले. 


उस्मानाबाद शहरातील पाणी पुरवठा योजना तोट्यात सुरु आहे. वीज बिल महिन्याला एक कोटी येते, वर्षाला १२ कोटी बिल येते आणि नागरिकांकडून वर्षाला तीन कोटी जमा होतात, त्यामुळे नागरिकांनी किमान पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केले आहे. 

From around the web