पावसाळ्यात गालिब नगरवासीयांना भोगाव्या लागत आहेत जिवंतपणी मरणयातना !

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रशांत (बापू) साळुंके यांची बिलाल मस्जिदसमोर शुक्रवारी स्वाक्षरी मोहीम

 
d

उस्मानाबाद - शहरातील गालिबनगर भागामध्ये रस्ते, नालीअभावी नागरिकांना पावसाळ्यात जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने  प्रशासनाला जाग यावी म्हणून शुक्रवार, 22 जुलै 2022 रोजी गालिबनगर येथील बिलाल मस्जीदसमोर स्थानिक रहिवाशांच्या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (बापू) साळुंके यांनी दिली आहे.

गालिबनगर, मिल्ली कॉलनी व सुलतानपुरा भागात मोठी लोकवस्ती आहे, परंतु इथे कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सोयीसुविधा नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. याबाबत शिवसेनेचे उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (बापू) साळुंके यांनी  गेल्या तीन वर्षांपासून नगर परिषद, तहसिलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदने देऊन, आंदोलने केलेली आहेत. परंतु या वसाहतींमध्ये पक्के रस्ते, नालीचे काम तसेच अतिक्रमण काढण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप साळुंके यांनी केलेला आहे. या भागातील नागरिकांच्या समस्यांची स्थानिक प्रशासन दखल घेत नसल्यामुळे  प्रशांत साळुंके यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. श्रीकांत कवडे यांच्यामार्फत दिवाणी याचिका सुद्धा दाखल केलेली आहे. सदरील याचिकेमध्ये जिल्हाधिकारी, तहसिलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे.  

यावर्षीच्या पावसाळ्यातही गालिबनगर येथील समस्या कायम असल्यामुळे येथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या प्रश्नावर प्रशासनाला जाग यावी म्हणून शुक्रवार, 22 जुलै 2022 रोजी गालिबनगर येथील बिलाल मशिदीसमोर स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (बापू) साळुंके यांनी केले आहे.

From around the web