उस्मानाबाद : छोटा जिल्हा, मोठी रुग्णसंख्या !

कोरोनाने आतापर्यंत दोन हजार मृत्यू !!
 
corona

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दररोज शंभराच्या आत आली आहे, पण अजूनही मृत्यूचे प्रमाण घटलेले नाही. दररोज किमान दोन ते पाच मृत्यूची नोंद होत आहे तसेच मागील काळात लपवलेले मृत्यूचे आकडेही  पोर्टलवर नोंद होत आहेत. यानिमित्त आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. 

उस्मानाबाद हा राज्यात सर्वात लहान जिल्हा आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाखाच्या आसपास तर शहराची लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे. पण राज्यात सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात २७ ऑगस्ट २०२१ अखेर ६५  हजार ८७१  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६३ हजार २९४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४६० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५७७ झाली आहे.

मागील काळात म्हणजे दुसऱ्या लाटेत लपवलेल्या  ५४०  मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३३३ ,कोविड बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०१ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.

म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार रुग्णाचा बळी गेला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निष्क्रिय आणि ढिसाळ कारभारामुळे कोरोना मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील हे वशिलाचे तट्टू आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार राम भरोसे सुरु आहे. 


कोरोना अजून गेलेला नाही... 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना हद्दपार झालेला नाही. सध्या ऍक्टिव्ह रुग्ण सहाशेच्या आसपास आहेत. अनलॉक झाल्यापासून लोक मोकाट सुटले आहेत. सोशल डिस्टिंसिंग, मास्क, हात धुणे याचे पालन होताना दिसत नाही. भाजी मंडई, बाजार पेठ मध्ये मोठी गर्दी  झाली आहे आणि याठिकाणी सोशल डिस्टिंसिंग दिसून येत नाही. 

त्यात राजकीय पक्षाचे आंदोलन सुरु आहेत. राडेबाजी सुरु आहे. तिसरी लाट येणार म्हणून सरकार चेतावणी देत आहे, पण लोक ते हसण्यावर नेत आहेत. लॉकडाऊन केल्यानंतर सरकारला शिव्या घालणारे लोक अनलॉक झाल्यानंतर सोशल डिस्टिंसिंगचा फज्जा उडवत आहेत. लोकांच्या तोंडावरील मास्क गायब झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याला सरकार नव्हे आपणच जबाबदार असू. 

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे उस्मानाबादचे जावई आहेत, त्यांनी आपल्या सासुरवाडीकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा सर्वाधिक कोरोना मृत्युचा जिल्हा म्हणून आरोग्य मंत्री टोपेच्या सासुरवाडीची नोंद होईल. 

- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 

( हा लेख आपणास कसा वाटला हे आमच्या व्हाट्स अँप वर कळवा - 7387994411  )

From around the web