उस्मानाबाद जिल्हा : ग्रीन झोन ते रेड झोन !

 
उस्मानाबाद जिल्हा : ग्रीन झोन ते रेड झोन !


तब्बल ३७ दिवस ग्रीन झोन मध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा आता रेड झोन मध्ये आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५ रुग्ण आढळून आले असून, पैकी सहा जणांना  डिस्चार्ज   देण्यात आला आहे.विशेष म्हणजे  डिस्चार्ज   देण्यात आलेल्या एका महिलेचा रिपोर्ट पुन्हा पॉजिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. 



उस्मानाबाद जिल्ह्यत सर्वाधिक रुग्ण उमरगा तर सर्वात कमी रुग्ण तुळजापूर तालुक्यात आहेत.  उमरगा - ८, कळंब -७, परंडा -६, लोहारा- ५, उस्मानाबाद - ३, वाशी -३, भूम - २, तुळजापूर - १  अशी तालुकानिहाय संख्या आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालल्याने चिंतेचे वातवरण पसरले आहे. 




दोन महिन्यापूर्वी जेव्हा कोरोना सुरु झाला, तेव्हा दिल्लीहुन आलेल्या दोन आणि मुंबईहुन आलेल्या एका रुग्णावर उपचार करण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी ठरली होती, त्यानंतर जिल्ह्यात तब्बल ३७ दिवस एकही रुग्ण नव्हता, पण ११ मे ते २४ मे दरम्यान तब्बल ३२ रुग्ण आढळून आले आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी दोन रुग्ण वाढत आहेत. रुग्ण आढळला की, त्या रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब तपासणीसाठी  लातूर किंवा सोलापूरला पाठवणे, त्यांना  क्वारंटाईन करणे यामुळे प्रशासनाची धावपळ वाढली आहे. 



स्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार १५८ जणांना क्वारंटाईन  करण्यात आले आहे.  पैकी  ३ हजार ४५३ जणांना होम क्वारंटाईन  तर १७०५ जणांना आयसोलेट करण्यात आले आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर येथून उस्मानाबाद जिल्ह्यात येणाऱ्या कामगार, मजूर, लहान व्यवसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या दोन महिन्यात १ लाख २० हजार  नागरिक जिल्ह्यात आले आहेत , मात्र  २२ हजार ९५९ नागरिक आल्याची सरकारी  दरबारी नोंद आहे.  प्रशासनाकडूनच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार ९३४ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या आकडेवाडीनुसार जिल्ह्यात आलेल्या व क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या संख्येमध्ये मोठी तफावत आहे.   

आरोग्य यंत्रणेबरोबर पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.  एखाद्या गावात रुग्ण आढळला की ते गाव सील करणे हे पोलीस दलासमोरील मोठे आव्हान आहे. जेव्हापासून कोरोनाचा कहर सुरु झाला आहे, तेव्हापासून आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि प्रशासनातील कर्मचाऱ्याची झोप उडाली आहे. त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. लॉकडाऊन असताना जिल्ह्यात ३५ रुग्ण आढळून आले आहेत तर लॉकडाऊन संपल्यानंतर किती रुग्ण वाढतील ? याचा अंदाज न केलेला बरा. 

उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी चांगले काम केले पण आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे. हा जिल्हा आता रेडझोन मध्ये आला आहे. याला जबाबदार कोण ? शासन, प्रशासन की आपण ? परजिल्ह्यातून आलेल्या लोकांमुळे जिल्ह्यात कोरोना वाढत आहे, असा आरोप केला जात असला तरी, जे लोक आले ते आपल्याच जिल्ह्यातील आहेत. त्यांना आल्यानंतर सार्वजिनक ठिकाणी क्वारंटाईन  करणे हे प्रशासनाचे काम असले तरी प्रशासनाला माहिती देण्याचे काम लोकांचे आहे.


मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर आदी हॉटस्पॉट शहरातून उस्मानाबाद जिल्ह्यात आलेल्या लोकांनी  १४ दिवस स्वतःला जपण्याची गरज आहे. एक तर हे लोक स्वतःहून    क्वारंटाईन   होत नाहीत. कुणी माहिती दिली तर नाईलाजाने सार्वजनिक ठिकाणी  क्वारंटाईन  होतात पण   दिवसा  क्वारंटाईन  ठिकाणी आणि रात्री घरी  झोपण्यासाठी  जात आहेत.  यामुळे कुटुंबातील अन्य व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग  होत आहे. तसेच  दिवसा  इतर लोक क्वारंटाईन   ठिकाणी  जेवणाचा डबा देण्यासाठी जात आहेत , तेव्हा दुरून  फिजिकल डिस्टन्स  पाळून डबा दिला पाहिजे, पण अनेक ठिकाणी तसे होताना दिसत नाही. तसेच बाहेर गावाहून आपला माणूस आला म्हणून त्याला भेटण्यासाठी घरातील सर्व लोक सार्वजनिक  क्वारंटाईन ठिकाणी झुंडने जात आहेत. ही भेटण्याची ओढ किमान १४ दिवस थांबली पाहिजे.  लोक सजग कधी होणार ? आरोग्य यंत्रणा, प्रशासन, पोलीस किती दिवस समजून सांगणार ? आपणच आपल्या पायावर दगड मारून घेत आहोत. 


आरोग्य, पोलीस आणि प्रशासनात काम करणारे  शेवटी माणसेच आहेत, ते आपले बंधू आणि भगिनी आहेत, त्यांना सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे . आता आपणास कोरोना बरोबर चालावे लागेल आणि जगावे लागेल.     सार्वजनिक ठिकाणी वावरताना  फिजिकल डिस्टन्स  पाळणे, चेहऱ्यावर आणि तोंडावर मास्कचा वापर करणे, बाहेरून घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुणे, याची सवय लावून घ्यावी लागेल. कोरोनावर अजून तरी उपाय सापडला नसला तरी 'मीच माझा रक्षक' हाच त्यावर सध्या तरी उपाय आहे. 

सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 

From around the web