चिंता वाढली, काळजी घ्या !

 
चिंता वाढली, काळजी घ्या !


उस्मानाबाद जिल्ह्यात आज एकदम तीन कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडल्याने  जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे तर प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ग्रीन झोन मध्ये असलेला हा जिल्हा आता या आठवड्यात ऑरेंज झोन मध्ये आला आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी तीन कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले होते. ते बरे झाल्यानंतर तब्बल ३७ दिवस एकही कोरोना बाधित रुग्ण नव्हता. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरु झाले होते तर एस.टी. बस सेवा देखील सुरु झाली होती, नेमके सोमवारीच परंडा  तालुक्यातील एक पिकप टेम्पो चालक कोरोना पॉजिटीव्ह निघाल्याने  एस.टी. बस सेवा एकच दिवसात बंद  करण्यात आली तर परंडा तालुक्यात जीवनाश्यक दुकाने वगळता अन्य दुकाने बंद करण्यात आली होती. 

त्यानंतर आज गुरुवारी कळंब  तालुक्यात एकदम तीन रुग्ण कोरोना  पॉजिटीव्ह  निघाले आहेत. पैकी दोघेजण पती पत्नी आहेत. ते मुंबईहुन गावी आथर्डी - पाथर्डी मध्ये आले होते. आल्यानंतर त्यांना शेतात  होम  क्वारंटाईन   करण्यात आले होते, त्यामुळे ते फार कमी लोकांच्या संपर्कात आले होते, मात्र कळंब शहरातील महसूल कर्मचाऱ्याने सर्वांची चिंता वाढवली आहे. तो औरंगाबादहुन आल्याचे समजते, तो अनेकांच्या संपर्कात आला असून त्यात काही रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे समजते. 

उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये राहावा यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस दल प्रयत्न करीत असताना बाहेरून आलेले लोक या जिल्ह्यातील लोकांची चिंता आणि प्रशासनाची डोकेदुखी  वाढवत आहेत. परंतु लोकांनीही स्वतःची काळजी घेऊन कोरोना बरोबर चालावे लागेल. इतर जिल्ह्याच्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्याची परिस्थिती चांगली आहे. प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे, जनतेनेही साथ द्यायला हवी. घाबरून न जाता बाहेर जाताना तोंडावर, नाकावर मास्क लावून सोशल डिस्टीन्सिंग पाळायला हवे. प्रशासन ज्या सूचना देते, त्याचे पालन करायला हवे, तरच आपण पुन्हा ग्रीन झोन मध्ये येऊ. 

- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 

From around the web