कोरोनाने थैमान : जबाबदार कोण ? 

 
कोरोनाने थैमान : जबाबदार कोण ?

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५४३० झाली आहे.दररोज किमान सहाशे ते सातशे ऍक्टिव्ह रुग्णाची भर पडत आहे., मृत्यू दर वाढत चालला आहे. किमान पाच ते दहा जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. 

जिल्हा शासकीय रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत. सर्व रुग्णालय ओसंडून वाहत आहेत.सरकारी असो अथवा खासगी हॉस्पिटल ! त्यात  ऑक्सिजन बेड शिल्लक नाहीत. शहरात अथवा जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही. कोरोनाची बाधा  होणाऱ्या रुग्णांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. त्यात संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ तर जीवघेणी ठरत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जारी करण्यात आली असली तरी, अजूनही अनेक लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. आता पोलिसांनी दंडुका हातात घेण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली तरच कोरोना आटोक्यात येणार आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी आपला पोलिसी खाक्या दाखवण्याची गरज आहे. 

किराणा, भाजीपाला, दूध आदी जीवनाश्यक दुकाने सोडून अन्य दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असताना, काहीजण चोरून व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहेत. शटर ओढून कोपऱ्यात उभे राहायचे आणि ग्राहक आले की , आतमध्ये घेऊन हवी ती वस्तू देण्याचे प्रकार सुरू आहेत. अश्या दुकानदारांना मोठा दंड करण्याची गरज आहे. मागील वर्षी ज्या पद्धतीने लॉकडाऊनच्या नियमाची काटकोर अंमलबजावणी करण्यात आली होती, ती यावेळी दिसत नाही. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नियम अधिक कडक करण्याची गरज आहे. 

उस्मानाबाद शहरातील कपिलधारा समशानभूमीत परवा एकाच वेळी १९ मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते तर आठ मृतदेह शिल्लक होते. त्यापैकी कोरोनाबाधित रुग्ण किती आणि अन्य आजाराने मृत पावणारे किती ? हे एक कोडेच आहे. शासन कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी १२ हजार रुपये अनुदान देते,  त्यात कुणी मढ्याच्या  ढाळूवरील लोणी तर खात आहे ना  ? हे तपासण्याची गरज आहे. जिल्हा रुग्णालयाकडून येणारी मृतांची आकडेवारी आणि प्रत्यक्षात अंत्यसंस्कार होणारे आकडेवारी यात फरक दिसून येत आहे. कश्यानेही  मृत पावला तर तो कोरोनाने मृत पावला, हे कुठे तरी थांबण्याची गरज आहे. लोक यामुळे अधिक भयभीत होत आहेत. 


गेल्यावेळी कोरोना योद्धे म्हणून मिरवणारे आणि सर्टिफिकेट घेणारे गायब झाले आहेत. सोशल मीडियावर उपदेशाचे डोस  पाजणारे स्वतः मात्र मोकाट फिरत आहेत.तथाकथित सामाजिक कार्यकर्ते या संकटाच्या काळात मदत करण्याऐवजी बिळात बसले आहेत. तेव्हा लोकांनीच जागृत होऊन, घरी सुरक्षित राहण्याची गरज आहे. बाहेर कामाशिवाय न जाणे, गेले तर मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, हात स्वच्छ धुणे आदी काळजी घेण्याची गरज आहे. काळ कठीण आहे. कोरोनाला हरवायचे असेल स्वतःची काळजी स्वतःला घ्यावी लागेल. घरी राहा ! सुरक्षित राहा !!

- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह  


 

From around the web