श्याम टरके यांचं अभिनंदन ... 

 
श्याम टरके यांचं अभिनंदन ...

साधारण  चार वर्षांपूर्वी औरंगाबादहून माहिती सहाय्यक श्याम टरके यांचा फोन आला आणि आपण 'पीएच.डी' करणार आहे आणि तुमचं सहकार्य हवं आहे, अशी इच्छा व्यक्त केली.  ‘हिंदी व मराठी वेब वृत्तपत्रांचा तुलनात्मक अभ्यास’ हा शोध प्रबंध आपण नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाला सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मला कुणी मदतीची हाक मारली आणि मी कधी नाही म्हटले असे कधी झाले नाही. श्याम टरके यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. माहिती कार्यालयात चांगली नोकरी असताना, तो व्याप सांभाळून श्याम टरके पीएच.डी साठी अभ्यास  करणार आहेत म्हटल्यावर मला त्यांचं  विशेष कौतुक वाटलं. मराठी वेब पोर्टलसाठी त्यांनी माझ्या उस्मानाबाद लाइव्हची निवड केल्याबद्दल आनंद झाला. 


उस्मानाबाद लाइव्ह वेबसाईट दहा वर्षांपूर्वी सुरु झाली, तेव्हापासून श्याम टरके  उस्मानाबाद लाइव्हला फॉलो करीत होते. ते नेहमी माझ्या फेसबुकवरील पोस्ट वाचत होते. त्यामुळे त्यांना माझी इत्यंभूत माहिती होती. ते गेली चार वर्षे उस्मानाबाद लाइव्ह वरील बातम्या तसेच हिंदी वेबवरील बातम्या वाचून  त्याचा तुलनात्मक अभ्यास करीत होते. 

तीन वर्षे अभ्यास केल्यानंतर त्यांनी शोध प्रबंध  तयार केला आणि  डिसेंबर २०१९ मध्ये  त्यांनी माझी पुण्यात भेट घेतली. तत्पूर्वी त्यांना मी कधी भेटलो नव्हतो. श्याम टरके आणि त्यांच्या पत्नी माझ्या घरी आले होते.गप्पा - टप्पा झाल्यानंतर त्यांनी माझी २० मिनिटे लाइव्ह मुलाखत घेतली. आजपर्यंत मी अनेकांच्या मुलाखती घेतल्या होत्या, पण श्याम टरके  यांनी माझी डिजिटल मीडियावर सविस्तर मुलाखत घेतली. २० मिनिटात कुठेही रिटेक झाला नाही, हे विशेष. 

( या मुलाखतीची लिंक - https://youtu.be/qYqPt1u4ILc )

शोध प्रबंध मध्ये माझ्या मुलाखतीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात युट्युब वर अपलोड करण्यात आलेल्या मुलाखतीचा  क्युआर कोड देण्यात आला आहे. मागील जानेवारी महिन्यात ( २०२० ) नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाला श्याम टरके यांनी शोध प्रबंध  सादर केला आणि बरोबर एक वर्षाने त्यांना पीएच.डी जाहीर झाली आहे. 

श्याम टरके यांचे करावे तितके कौतुक कमी आहे. नोकरीचा व्याप सांभाळून, घरप्रपंच सांभाळून त्यांनी पीएच.डी साठी अभ्यास केला.चांगली नोकरी असताना व्याप सांभाळून सहसा कुणी अभ्यास करीत नाही. श्याम टरके यांच्या नावासमोर आता डॉ. ही  उपाधी लागणार आहे. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन ! 


सुनील ढेपे, 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 


 

From around the web