उस्मानाबादकरांना कोरोनाची धास्ती

 
उस्मानाबादकरांना कोरोनाची धास्ती
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण पॉजिटीव्ह नाही. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील लोक  कोरोनाबद्दल  चांगलेच धास्तावले आहेत . त्यात शाळा, महाविद्यालय, मंदिरे, आठवडी बाजार बंद करण्यात आल्याने कोरोनाबद्दल लोक चांगलेच चिंताग्रस्त झाले आहेत.

राज्यात कोरोनाचे 39  तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मिळून १६ रुग्ण  आढळले आहेत.  त्यामुळे पुण्याहून माणूस आला की, लोक धास्ती घेत आहेत. यातून उस्मानाबाद तालुक्यातील एका निरपराध व्यक्तीला त्रास सहन करावा लागला.

उस्मानाबाद तालुक्यातील सम्रुद्रवाणी येथील  ५५  वर्षाचा एक व्यक्ती पुण्यातील एका नातेवाईकडे गेला होता, गावी परत आल्यानंतर कोरोनाच्या भीतीपोटी गावकऱ्यांनी त्यास स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात  बळजबरीने दाखल केले होते, त्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने या व्यक्तीला  अँब्युलन्सने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे कोरोना संशयित रुग्ण म्हणून पाठवले पण तो येथे आल्यानंतर कोरोना वार्डच बंद होता. तो एक तास त्या कोरोना वार्डसमोर उभा होता, पण कुणीही कर्मचारी फिरकला नाही.

उस्मानाबाद लाइव्हने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या या बेफिकीर कारभाराची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर अधिकाऱ्यांची धावाधाव सुरु झाली आणि त्या संशयित रुग्णास त्या वार्डमध्ये ऍडमिट करून घेण्यात आले.मात्र तपासणी मध्ये तो व्यक्ती ठणठणीत असून, त्यास कसलाही आजार झालेला नाही, गावकऱ्यांनी बळजबरीने त्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले, त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही अँब्युलन्सने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे कोरोना संशयित रुग्ण म्हणून पाठवले यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.यात गावकऱ्यांची आणि स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची चूक आहे.


मात्र यानिमित्त  उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाची यंत्रणा ढेपाळलेली दिसली. एकीकडे कोरोनासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला जात होता, मात्र उस्मानाबादेत अजून कसलीही यंत्रणा उभी नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनेक वैद्यकीय अधिकारी यांचे बाहेर मोठमोठे हॉस्पिटल आहेत, त्यांचे सर्व लक्ष स्वतःच्या खासगी हॉस्पिटलकडे असते, मात्र जिल्हा शल्य चिकित्सक यांचे स्वतःच्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचे उद्योग सुरु आहेत.

उस्मानाबाद लाइव्ह कोणत्याही फेक न्यूज देत नाही. आम्ही गेल्या ३० वर्षापासून पत्रकारितेत आहोत. आम्हाला समाजाचे आणि पत्रकारितेचे भान आहे. ती बातमी देण्यामागे आमचा हेतू लोकांना घाबरवणे असा नव्हता तर आरोग्य यंत्रणा कशी झोपलेली आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न होता.


लोक कोरोनामुळे धास्तावले आहेत, आरोग्य यंत्रणा सजग आणि सुसज्ज हवी.  लोकांवर खापर फोडण्याऐवजी स्वतःच्या कारभारात सुधारणा करावी,उस्मानाबाद लाइव्हवर कुणी खोट्या तक्रारी करून दबाब टाकत असेल तर  त्याला आम्ही कधीच भीक घालत नाही. निर्भीड, निष्पक्ष आणि सडेतोड आमचा बाणा आहे आणि जनतेसाठी तो सदैव कायम ठेवू...

- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह


From around the web