मायबाप सरकार , आता तरी जागे व्हा !

 

मायबाप सरकार , आता तरी जागे व्हा !

लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले मध्य प्रदेशातील १९ मजूर  शेकडो किलोमीटर पायी चालत  निघाले, जाताना पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून रेल्वेमार्ग निवडला आणि रेल्वेनेही त्यांना चिरडून टाकले. एका झटक्यात १६ मजूर चिरडले गेले, तीन मरणाच्या दारात आहेत. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना मराठवाडयात औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा परिसरात घडली. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले, मजुरांना मालकाने कामावरून काढून टाकले. लोकांनी दिलेल्या अन्नावर मजुरांनी दिवस काढले पण घरची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. आता येथे थांबून काय करायचे म्हणून अनेक मजूर आपापल्या गावी जात आहेत. वाटेत त्यांची ठिकठिकाणी कोंडी होत आहे. गावी गेले तर गाववाले स्वीकारायला तयार नाहीत. न सांगता आडवाटेने आला म्हणू पोलीस गुन्हे दाखल करीत आहेत. सांगा यांचा काय दोष ? हे मजूर गुन्हेगार आहेत का ? केवळ मुंबई, पुणे, औरंगाबाद येथून आला म्हणून तो कोरोनाग्रस्त कसा होईल ? आल्यानंतर त्याला फार तर १४ दिवस   विलगीकरण कक्षात ठेवा पण त्याला गुन्हेगार ठरवू नका. 

या मजुरांना असेच डांबून ठेवले तर मोठा विस्स्पोट होईल. मागच्या महिन्यात मुंबईतील  वांद्रे परिसरात किमान तीन हजार मजुरांचा जमाव जमला  होता. तो कसातरी पांगला. आता असा जमाव जमू नये यासाठी काळजी घ्यायाला हवी. एक तर लॉकडाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी द्यायला हवी होती, आता ४५ दिवस लोटून गेले आहेत. आता पर राज्यातील मजुरांना जाण्यासाठी रेल्वे आणि राज्यातल्या राज्यात जणाऱ्या मजुरांना  एसटीची सोय करायला हवी. जाचक अटी काढून टाकायला हव्यात. जिल्हा प्रशासनाने जे हेल्पलाइन नंबर दिले आहेत ते एक तर लागत नाहीत किंवा उचलले जात नाहीत. अनेक हेलपाटे मारूनही अधिकारी दाद देत नाहीत. मायबाप सरकार आता तरी जागे व्हा ! या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी योग्य नियोजन करा. या भाकरीची किंमत श्रीमंत माणसाला काय कळणार ? 


मायबाप सरकार , आता तरी जागे व्हा !

करमाड जवळ  ठार झालेल्या मजुरांच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत जाहीर कऱण्यात आली आहे. ज्यांचे आख्खे कुटुंब ठार झाले त्यांची मदत कोणाला देणार ? आता मदत मिळणार म्हणून खोटे नातेवाईक पुढे येतील, पण  मजुरांच्या जीवाची किंमत फक्त पाच लाख आहे का हो ? रेल्वे अपघातात ठार झालेल्या ठिकाणी मजुरांच्या हाती भाकरी होत्या. त्या भाकरी पाहून मन हेलावून जात आहेत. भाकरीची किंमत किती असते ? ते श्रीमंत लोकांना काय कळणार ? 

ज्या भाकरीसाठी  मध्य प्रदेशातील मजूर महाराष्ट्रात  आले होते, त्याच भाकरी आज त्यांच्या रक्तात नाहाल्या. भाकरीचे गाठोडे उशाला असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. हे विदारक चित्र पाहून कवी प्रवीण हटकर यांच्या ओळीची प्रचिती आली. ते म्हणतात - 

‘भाकर करंटी 
रक्तात नाहली; 
वांझोटी राहिली 
भोगाविना।’ 


तर कवी  भीमराव गवळी म्हणतात, 

  भाकरीसाठी गाव सोडलं...
माय सोडली, बाप सोडला, 
बकरी सोडली, झोपडी सोडली. 
भाकरीसाठी पहाड खोदला, 
खदान खोदली, कंबर मोडली, 
भाकरीसाठी रक्त सांडलं, 
शिव्या खालल्या, मार खाल्ला, 
अपमानाच्या परिसीमेत जगलो, 
भाकरीसाठी पायपीट केली, 
जिंदगीची वणवण झाली,
अन् 
शेवटी रेल्वे रुळावर भाकरीच 
सोडून जावं लागलं, 
भाकरीने आयुष्य दिलं, 
भाकरीनेच आयुष्य नेलं!!!

- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 
9420477111

From around the web