उमरग्याजवळ ट्रकची ऑटोला धडक : चार ठार, तीन जखमी 

 
s

उमरगा : उमरग्याजवळ ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात  चार ठार तर  तीन जखमी झाले आहेत. या अपघातात एक बालक बालंबाल बचावले आहे. हा अपघात महाराष्ट्र -  कर्नाटक सीमेवरील  तलमोड हद्दीत सोमवारी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान घडला आहे. श्रावण सोमवार निमित्त कर्नाटकातील अमृतकुंड येथे देवदर्शन आटोपून गावाकडे परतणाऱ्या  जगदाळे कुटुंबावर काळाने हा घाला घातला. 

उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी येथील सुनिल महादेव जगदाळे (३५) हे श्रावण सोमवारच्या निमित्ताने आई, पत्नी, मुलगी, भाची व अन्य दोघी, असे सात जण ऑटोरिक्षाने कर्नाटकच्या बसवकल्याण तालुक्यातील अमृतकुंड येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत गावाकडे निघाल्यानंतर सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील मन्नाळी कॉर्नर येथे एका ट्रकने जगदाळे यांच्या ऑटोरिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली

मृतांमध्ये ऑटो चालक सुनील महादेव जगदाळे, चालक (वय 40) रिक्षा चालकाची पत्नी बायको प्रमिला सुनील जगदाळे (वय 35)सुनीलची आई अनुसया महादेव जगदाळे (वय 70) पूजा विजय जाधव, (वय 18, भाची) यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर गीता शिवराम जगदाळे (वय 35) गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना लातूरला हलविण्यात आले आहे.अस्मिता शिवराम जगदाळे (वय 11), लक्ष्मी सुनील जगदाळे (वय 11) हे किरकोळ जखमी असून एका बालकाला काहीच झाले नाही. 

मृत सुनील हे आपल्या मालकीच्या (MH25 M –1319) या आप्पे ऑटोमधून देवदर्शनाकरिता शेजारील कर्नाटक मधील अमृत कुंड येथे गेले होते. देवदर्शन करुन परत येताना हैद्राबादहुन सोलापूरकडे जाणाऱ्या (KA56- 0575) ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा भयंकर अपघात झाला. मृत सुनील यांचे कुटुंब मुरुम साखर कारखाना शेजारच्या विठ्ठल मंदिराचे पुजारी आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांनी अपघातस्थळी भेट दिली. तर उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

e

ट्रक चालक गेला पळून...

रिक्षाला धडक दिल्यानंतर अपघाताची भीषणता पाहून ट्रकचालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे. बसवकल्याणचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवमसु राजपूत, पोलिस निरीक्षक सुवर्णा मलशेट्टी, पोलिस हवालदार राजशेखर रेड्डी, मल्लीकार्जुन सलगरे यांनी अपघातस्थळी भेट देऊन जखमींना उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. प्रभाकर बिचकाटे यांनी जखमींवर उपचार केले.


पती-पत्नीचा मृत्यू, मुले उघड्यावर...
या अपघातात सुनील जगदाळे व त्यांची पत्नी प्रमिला हे दोघेही मयत झाले आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून, हे दोघेही दहा वर्षाच्या आतील आहेत. आई-वडील तसेच आजीही अपघातात मृत्यू पावल्याने हे दोन्ही मुले उघड्यावर आली आहेत.

From around the web