धाराशिवमध्ये अखेर 29 लाखाचा गुटखा आणि 10 लाखाचा टेम्पो जप्त 

'धाराशिव लाइव्ह' चा दणका 
 
s
आरोपींची ही शक्कल  : तांदळाचे पोते आणि पाठमागे गुटखा

धाराशिव  -  धाराशिव लाइव्हच्या बातमीनंतर  अखेर 29 लाखाचा गुटखा आणि 10 लाखाचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे. आनंदनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उड्डाण पुलावर गुटख्याचा एक टेम्पो पकडला  होता, पण शनिवारी सकाळचे साडेदहा वाजले तरी गुन्हा दाखल झाला नव्हता, पोलिसांकडून तोडपाणी सुरू होती, धाराशिव लाइव्हने बातमी देताच, पोलिसांच्या तोडपाणीवर पाणी पडले आणि अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शुक्रवारी रात्री एक आयशर टेम्पो कर्नाटक राज्यातून गुटखा घेऊन बीड कडे जात असताना, पोलिसांनी हा टेम्पो उड्डाण पुलावर पकडला. संशय येऊ नये म्हणून समोर तांदळाचे पोते आणि पाठीमागे गुटखा भरण्यात आला होता, पण आरोपींची ही शक्कल महागात पडली.  हा टेम्पो पकडल्यानंतर दहा लाखाची तोडपाणी करण्यात आली, पण पैसे ने मिळाल्याने हा टेम्पो आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला. 

सकाळी साडेदहा वाजले तरी या  गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने संशय बळावला. धाराशिव लाइव्हने हे बिंग फोडतात, पोलिस हादरले. वरिष्ठ अधिकार्यांनी देखील पोलीस निरीक्षकांची कानउघडणी केली. त्यानंतर अखेर 29 लाखाचा गुटखा आणि 10 लाखाचा टेम्पो जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. 

 दिनांक 30.06.2023 रोजी रात्री उशिरा पोलीस ठाणे आनंदनगर येथे मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलीसांनी सापळा लावून तुळजापूर कडून बीड कडे जात असलेल्या एक चौकलेटी रंगाचा टेम्पो क्र. ए पी 23 डब्ल्यु 2999 हा टेम्पो एक आय डी सी उड्डाण्पूल उस्मानाबाद येथे पकडून त्यातील मालाबाबत चालक मोहम्मद इरफान मोहम्मद आरीफ, वय 27 वर्षे, व्य चालक, रा. एम एस के मिल जवळ, जिलानाबाद, गुलबर्गा( कर्नाटक) व त्याचा सहकारी सय्यद आसीफ सय्यद रुकमोद्दीन वय 26 वर्षे, रा. कडगंची, गुलबर्गा विद्यापीठ जवळ, गुलबर्गा (कर्नाटक) यांना विचारणा केली असता त्यांनी सदर टेम्पोमध्ये पान मसाला, तंबाखु असा मुद्देमाल असल्याचे कबुल केले. सदर वाहनात शासनाने प्रतिबंधित केलेले पदार्थ असल्याची खात्री झाल्याने नमुद इसम व त्यांचे ताब्यातील मुद्देमाल असे टेम्पोसह पोलीस ठाणे आनंदनगर येथे आणुन सदर इसमांच्या विरुध्द कलम 328, 188, 272, 273, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींना अटक करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांना पत्रकारानी छेडले असता, आम्ही अन्न आणि भेसळ विभागाला पत्र दिले होते, पण त्यांनी रिस्पॉन्स न दिल्याने गुन्हा दाखल करण्यास वेळ लागला, असा खुलासा केला. 

 अन्न आणि भेसळ विभागाशी संपर्क साधला असता, पोलिसांनी कोणतेही पत्र न दिल्याचे सांगितले. यावरून पोलिसांची तोडपाणी फसल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून, याप्रकरणी पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्यावर पोलीस अधीक्षक कोणती कारवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे. 

From around the web