राज्य सरकार महिलांचे रक्षक नसून भक्षक - चित्रा वाघ 

बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचे काम होत असल्यामुळे राज्यात बलात्काराच्या घटना वाढल्या
 
राज्य सरकार महिलांचे रक्षक नसून भक्षक - चित्रा वाघ

उस्मानाबाद  - महाआघाडी सरकार हे महिलांचे रक्षक नसून ते भक्षक बनले आहे. कारण राज्यातील बलात्कार करणार्‍या नराधमाला अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी बलात्काऱ्यांनाच राजाश्रय देण्याचे काम करीत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात महिलांवर अन्याय, अत्याचार व बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे केला.

उस्मानाबाद येथील प्रतिष्ठाण भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी गरड,‌‌ भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. अनिल काळे, दिपक जवळगे, ॲड. नितीन भोसले, इंद्रजित देवकते, क्रांति थिटे, पुजा राठोड, अंजली बेताळे आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे नवनीत शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय बालिकेवर तिघा नराधमांनी अत्याचार केला असून त्यापैकी एका आरोपीला अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही. या कुटुंबांची मी व माझ्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली असून ही घटना अतिशय वेदना देणारी आहे. या पूर्वीदेखील अणदूर येथे एका महिलेवर असाच अत्याचार करण्यात आला होता. 


तसेच उमरगा तालुक्यातील चौरस्ता येथे वीटभट्टीच्या कामावर काम करणाऱ्या मजुर महिलेवर व सास्तूर येथील एका बालिकेवर देखील असाच अत्याचार करण्यात आलेला आहे. महिलांवर अन्याय, अत्याचार व विनयभंगाच्या घटना वारंवार घडतातच कशा ? असा संतप्त सवाल करून त्या म्हणाल्या की, बाईवर हात टाकताना या नराधमांना भीती कशी वाटत नाही ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.‌ 

 नांदेड जिल्ह्यात एका पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्दयपणे खून करण्यात आला. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात देखील अल्पवयीन मुलीवर असाच अत्याचार करण्यात आला. त्या बरोबरच सातारा जिल्ह्यात देखील एका ५० वर्षीय मूकबधिर महिलेवर अत्याचार करण्यात आला. सास्तूर अत्याचार प्रकरणी संबंधित अत्याचारित बालिकेला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने तिला आजघडीला व्यवस्थित व नीटनेटके चालत येत  नसल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसून राज्याचे गृहमंत्री देशमुख हे गुंडा बरोबर फोटो काढत आहेत. परंतू अत्याचारीग्रस्त कुटूंबाला भेट देण्यास त्यांना वेळ नाही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच राज्य सरकार हे अत्याचार करणाऱ्यांना शासन करण्याऐवजी त्यांना क्लीन चिट देण्यात मश्गुल आहे. विशेष म्हणजे बलात्काऱ्यांना राजाश्रय मिळत असल्यामुळेच महिलांवरील अन्याय, अत्याचार व बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.


कायद्याची अंमलबजावणीच नाही

महिलांवरील अन्याय अत्याचार व बलात्कार करणाऱ्यांना जरब असावा यासाठी त्यांना कठोर शिक्षा करण्याची तरतूद असणारे अनेक कायदे करण्यात आलेले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे‌अन्याय, अत्याचार व बलात्कार  मनोबल वाढत आहे. त्यामुळे सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या मंडळींची जोपर्यंत न्यायाची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत महिलांना सुरक्षा देण्याची अंमलबजावणी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


गृहमंत्री कार्यकर्त्यांना वाचविण्यात दंग !

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर बलात्काराचे आरोप व एफआयआर नोंद झाल्यानंतर देखील त्यांना‌ क्लीन चीट देऊन त्यांना वाचविण्यात दंग आहेत. माझे व भाजपचे म्हणणे असे आहे की, ज्यांच्यावर आरोप झाले आहेत व एफआयआर नोंद झाला आहे अशा सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना पाठिशी न घालता त्यांच्यावर थेट कारवाई करून त्यांच्या मुसक्या आळविण्यात याव्यात अशी अपेक्षा व मागणी देखील वाघ यांनी केली.


कुटुंबातील अत्याचारित वाऱ्यावर !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही घोषणा करुन राज्यातील प्रत्येक नागरिकांची सुरक्षा व काळजी घेतल्याचे आश्वासन देतात. मात्र त्यानुसार वागत नसून त्यांच्याच म्हणजेच राज्यातील जनतेच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यावर अन्याय अत्याचार व बलात्कार केला जातो. तेंव्हा त्यांना न्याय देण्याऐवजी त्यांच्याकडे पाठ फिरवून त्यांना वाऱ्यावर सोडले जाते, असा सनसनाटी आरोप करून त्या म्हणाल्या की, अत्याचारित सदस्यांनी न्याय मागण्यासाठी जायचे कोणाकडे ? असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

From around the web