उस्मानाबादेत बाजारपेठ कडकडीत बंद
उस्मानाबाद - जीएसटी कायद्यातील जाचक तरतुदीविरोधात व ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट)च्यावतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या भारत व्यापार बंद आंदोलनाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्हा व्यापारी महासंघ व जिल्हा कैट समितीच्यावतीने करण्यात आलेल्या बंदच्या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शहरी भागातील व्यापार्यांनी आपली दुकाने दिवसभर बंद ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत पाठविण्यात आले.
जीएसटी कायद्यातील जाचक व अन्यायकारक तरतुदी वगळण्यात याव्यात, कायद्याचे सुलभीकरण करण्यात यावे, कारण कोरोना संकटामुळे व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. त्यातच या अन्यायकारक तरतुदींची भर पडली. तसेच ई-कॉमर्स कंपन्या याचा फायदा घेत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व्यापारी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. व्यापार्यांच्या विविध समस्यांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट)च्यावतीने शुक्रवारी भारत व्यापार बंद पुकारला होता. या बंदला उस्मानाबाद शहरासह उमरगा, भूम, परंडा, वाशी, कळंब व लोहारा शहरात मोठा प्रतिसाद मिळाला.
व्यापार्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा कैट समितीचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव लक्ष्मीकांत जाधव, कोषाध्यक्ष धनंजय जेवळीकर, मोटारमालक असोसिएशनचे मैनुद्दीन पठाण, कर सल्लागार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. रवींद्र कदम, अमर खडके, मनोज कोचेटा, गिरीष अष्टगी, निलेश भोसले, योगेश सोन्ने पाटील, अमित मोदाणी, चंद्रकांत गार्डे, अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
विविध संघटनांचे बंदला समर्थन
जीएसटी कायद्यातील जाचक तरतुदींविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्ह्यातील विविध संघटनांनी समर्थन दिले आहे. मोटारमालक असोसिएशन, किराणा दुकानदार संघटना, मशीनरी व्यापारी, सराफ, सुवर्णकार असोसिएशन, स्टील-सिमेंट व्यापारी संघ, कापड दुकान, कृषी निविष्ठा व्यापारी, बेकरी, हॉटेलचालक संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेवून आपले समर्थन नोंदविले. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जाहीर समर्थन दिले आहे.