पाडोळी परिसरातील अवैध धंदे बंद करा, अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्या
पाडोळी - बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाडोळी(आ),टाकळी ( बेंबळी) कनगरा, समुद्रवाणी आदी गावासह या गावच्या परिसरातील सर्व हॉटेल, ढाब्यावर मागील काही वर्षांपासून अवैध दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. सपोनि एम.जी. शेंडगे यांच्या आशीर्वादामुळे हे अवैध धंदे सुरु आहेत.
पाडोळी(आ) येथील व्यंकट मोहन गुंड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अवैध दारूविक्री येत्या विजयी दशमी सणापर्यंत बंद करावी अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी म्हणून अर्ज केला आहे.
बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाडोळी(आ),टाकळी ( बेंबळी)कनगरा, समुद्रवाणी आदी गावासह या गावच्या परिसरातील सर्व हॉटेल, ढाब्यावर माघील काही वर्षांपासून अवैध दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. त्याच अनुषंगाने व्यंकट मोहन गुंड यांनी पाडोळी गावच्या परिसरातील आणि मेंढा,समुद्रावाणी पाटी लगत असलेल्या सर्व अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाबा चालकांवर आणि तेथील जमीन मालकावर गुन्हे दाखल करा,किंवा पाडोळी(आ) येथील पोलीस दुरक्षेत्र हटवावे अन्यथा विजया दशमी या सणादिवशी मला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
सपोनि एम.जी. शेंडगे बेंबळी पोलीस स्टेशनला दीड वर्षांपूर्वी जॉईन झाले. तेव्हापासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत. येथून बदलून गेलेले एसपी राजतिलक रौशन यांचा लाडका अधिकारी म्हणून शेंडगे यांची ओळख आहे. त्यांची बदली करावी, अशी मागणी होत आहे.