ग्रामीण भागातील रूग्णालयांना वैद्यकीय यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्या
उस्मानाबाद- ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ग्रामीण भागातील उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी वैद्यकीय यंत्रसामुग्री व आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आ.सतीश चव्हाण यांनी आज (दि.4) लोहारा येथील ग्रामीण रूग्णालय, उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालय, लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था आदी ठिकाणी भेटी देऊन कोरोनाच्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला.
लोहारा तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. लोहारा ग्रामीण रूग्णालयाकडे आवश्यक वैद्यकीय यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने येथील गंभीर रूग्ण तुळजापूर, उस्मानाबाद याठिकाणी उपचारासाठी जात आहेत, मात्र त्याठिकाणी देखील व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांच्या लक्षात आले. आ.सतीश चव्हाण यांनी लागलीच विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांच्याशी फोनव्दारे चर्चा करून येथील परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
याठिकाणी ऑक्सिजन लिक्विड प्लांट, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स, बायपॅप मशिन्स आदी वैद्यकीय यंत्रसामुग्रीची नितांत गरज असून ती उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सुनील केंद्रेकर यांनी देखील संबंधित अधिकार्यांशी बोलून लवकरच हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आ.सतीश चव्हाण यांना सांगितले. लोहारा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.गोविंद साठे यांना सदरील यंत्रसामुग्रीचा प्रस्ताव तातडीने जिल्हा रूग्णालयाकडे सादर करण्याची सूचना आ.सतीश चव्हाण यांनी केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, तहसीलदार संतोष रूईकर, सतीश इंगळे, डॉ.काळे आदींची उपस्थिती होती.
उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयास देखील आ.सतीश चव्हाण यांनी भेट देऊन तालुक्यातील कोविड रूग्ण संख्या, उपलब्ध यंत्रसामुग्री व साहित्य, आवश्यकता असलेली यंत्रसामुग्री, डॉक्टर व इतर कर्मचार्यांची संख्या किती आदींचा आढावा घेतला. तसेच ईदगाह फंक्शन हॉल येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला आ.सतीश चव्हाण यांनी भेट देत कोविड बाधित रूग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली.