नळदुर्ग : गुटखा तस्करी प्रकरणी हा घ्या तिसरा पुरावा 

धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर आठ पोलिसांची चौकशी 
 
sx

धाराशिव - महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असली तरी, शेजारच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यात गुटख्यावर कसलीही बंदी नाही. या दोन राज्यातून लाखो रुपयांचा गुटखा उमरगा, नळदुर्ग मार्गे धाराशिवसह  महाराष्ट्रात पुरवठा केला जातो. महाराष्ट्रात  पुरवठा करणाऱ्या  गुटखा तस्कर  नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) चे उमरगा आणि नळदुर्ग  पोलिसांचे कनेक्शन असल्याचे उघड झाले असून, दि  १९ जुलै रोजी  नळदुर्गच्या तरुणांनी पकडलेल्या  त्या टेम्पोमध्ये ३ टन गुटखा होता, याचा पुरावाच धाराशिव लाइव्हने यापूर्वी दोन वेळा दिला आहे. आता तिसरा पुरावा  हाती लागला आहे. दरम्यान धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर नळदुर्ग पोलीस स्टेशनमधील चार आणि स्थानिक गुन्हे शाखेमधील चार पोलिस चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. 

निगडी ( पुणे ) येथील निखिल ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) हा हैद्राबाद येथून   गुटखा भरून नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येताच, दि. १९ जुलै रोजी रात्री  गोलाई चौक, चिवरी पाटीजवळ काही तरुणानी जबर्दतीने आडवून तो सपोनि  सिद्धेश्वर गोरे यांच्या ताब्यात दिला होता.  

गोरे यांनीच गुटखा, गांजा पकड्ण्यासाठी काही तरुणाची टीम तयार केली होती. हे तरुण झिरो पोलिस म्हणून वावरत होते. ज्यांचा हप्ता येतो त्यांच्या गाड्या सोडून द्यायच्या आणि ज्यांचा हप्ता येत नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल करून नंतर वेगवेगळ्या  धमक्या दाखवून पैसे उकळण्याचे काम मागील दोन वर्षात सुरु होते. 


गुटख्याचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) पकडल्यानंतर  गुटखा तस्कर नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) हा चांगलाच चिडला आणि हप्ता देऊन देखील गाड्या पकडत असाल तर काय उपयोग म्हणून सुनावल्यानंतर गोरेनी  त्या टेम्पोमधील गुटखा चालकांमार्फत अज्ञात ठिकाणी उतरवून, रिकामा टेम्पो दाखवून दि. २१ जुलै रोजी गुटख्याच्या गाड्या पकडणाऱ्या गणेश नागनाथ वचने ( वय १९ ) , सय्यद अमीर अझहर जहागीरदार ( वय २२), संदीप संजय राठोड , सुशील संजय  राठोड, मिटू उर्फ इंद्रजितसिंह ठाकूर सर्व रा. नळदुर्ग यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. टेम्पो चालक सहदेव माडजे  रा. कोंडजी ता. लोहारा यास मारहाण करून १२ लाखाचा आयशर टेम्पो आणि खिशातील ३५ हजार जबरदस्तीने पळवून नेल्याचा गुन्हा या झिरो पोलिसांवर दाखल  करण्यात आला आहे. 


पोलिसांच्या सांगण्यावरूनच आपण गुटख्याचा सदर टेम्पो  ताब्यात घेतला पण पोलिसांनी वाटा देण्याऐवजी दरोड्याचा गुन्हा दाखल  केल्याने  हे झिरो पोलीस चांगलेच चिडले. यातील सय्यद अमीर अझहर जहागीरदार याच्या चुलत्याने सर्व पुरावे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना  दिल्याने गोरेंची अवघ्या चार दिवसात पोलीस मुख्यालयात उचलबांगडी झाली. जाताना देखील गोरेंनी चमकोगिरी करणाऱ्याकडून  फुले उधळून घेतले आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली, मात्र त्यांचे सर्व काळे कारनामे काही दिवसातच उघड झाले आहेत. 

हा घ्या तिसरा  पुरावा 

s


आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) चा चालक सहदेव माडजे याने नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण दि. १४ जुलै रोजी पुण्याहून हैद्राबाद येथे  केमिकल ड्रम  घेऊन गेलो होतो.परत येताना भाडे न मिळाल्याने रिकामा टेम्पो घेऊन दि. १८ जुलै  रोजी  निघालो आणि  दि.१९ जुलै रोजी तरी तुळजापूर रस्त्यावर आलो असता काही तरुणांनी जीप आडवी लावून  टेम्पो अडवला आणि खिशातील ३५ हजार रुपये घेऊन एका ठिकाणी नेवून मारहाण केली असे म्हटले आहे. 

टेम्पो रिकामा होता असे चालकाचे म्हणणे होते. मात्र रिकाम्या गाडीचे वजन ४ हजार १७४ किलो भरते, पण हीच गाडी १९ जुलै रोजी उमरगा चेक पोस्ट नाक्यावर आल्यावर वजन ७ हजार ३१० किलो भरले  आहे. तसेच चालकाने चेक पोस्ट नाक्यावरील वजन काट्यावर वजन केल्यानंतर शासकीय  नियमानुसार ७२० रुपये कॅश भरली आहे. नळदुर्गला गेल्यानंतर गाडीचे वजन अचानक कसे कमी झाले ? याचा अर्थ गाडीत ३ टन गुटखा होता, हे उघड आहे. 

d


तसेच गुन्हा १९ जुलै रोजी घडला असताना, २१ जुलै रोजी रात्री दाखल झाला आहे. याचा अर्थ टेम्पोमधील गुटखा खाली करून, नंतर दरोड्याचा गुन्हा दाखल  करण्यात आला, हे स्पष्ट आहे.  टेम्पो पुण्याला जाणार होता तर थेट सोलापूरला जाण्याऐवजी तुळजापूरकडे का वळवण्यात आला  हेही एक कोडेच आहे. 

नळदुर्ग  पोलीस स्टेशनचे  तत्कालीन सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) चा चालक सहदेव माडजे याच्यावर गुन्हा दाखल करण्यावेजी चालकाच्या सांगण्यावरून  नळदुर्गमधील झिरो पोलीस असलेल्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने हे लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. गोरेचे काळे कारनामे हे झिरो पोलीस व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहेत, हे विशेष. 


वसुलीत ' प्रवीण' असलेल्या खासगी वसूलदारामार्फत अवैध गुटखा, गोमांस, रेशनचा माल , बायो डिझेलदाराकडून  लाखो रुपयाची वसुली मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात सुरु होती. नळदुर्ग पोलीस स्टेशन सोन्याचे अंडे देणारी कोंबडी  असल्याने  मागील साहेबानी येथे येण्यासाठी २२ लाख मोजल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. साहेबानी दोन वर्षात कोट्यवधी रुपये कमावले असून, त्याची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करण्याची मागणी होत आहे. 


आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून धाराशिव जिल्ह्यात येणारा गुटखा उमरगा, नळदुर्ग मार्गे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात वितरित केला जातो. या भागातून गुटखा पुरवठा करणाऱ्या  नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) ने   एका पोलिसांमार्फत पोलिसाना दरमहा हप्ता पोहच करण्याची व्यवस्था लावली आहे. जिल्ह्यात जवळपास दहा लाख रुपये दरमहा वाटप होत असल्याचे समोर येत आहे. 

गुटखा तस्कर  नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) याचे नाव सोलापूरच्या एका गुन्ह्यात सर्वप्रथम उघड झाले होते, तेथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाने कर्नाटक राज्यातील हुमनाबाद येथे जाऊन मोठी कारवाई  केली होती. जवळपास २ कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. 


गुटख्याची गाडी पकडणारी टोळी नळदुर्ग, उमरगा, लातूर, तुळजापूर, सोलापूर येथे सक्रिय असून, या टोळीतील तरुण झिरो पोलीस म्हणून रात्रभर उमरगा - सोलापूर आणि नळदुर्ग - तुळजापूर रस्त्यावर रात्रभर गस्त घालत असल्याचे दिसून येत आहे,.

नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी  याचे सीडीआर तपासल्यास धाराशिव जिल्ह्यातील कोणकोणते पोलीस गुटखा तस्करीत अडकले आहेत, हे उघडकीस येणार आहे. 

डीवायएसपीमार्फत चौकशी सुरु 

गुटखा तस्करीची मालिका धाराशिव लाइव्हने प्रसिद्ध केल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तुळजापूरचे डीवायएसपी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांना नियुक्त केले आहे. देशमुख यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनमधील चार आणि स्थानिक गुन्हे शाखेमधील चार पोलिसांना नोटीसा देऊन जबाब नोंदवले आहेत. आता याप्रकरणी त्यांच्यावर कोणती कारवाई होणार ? याकडे लक्ष वेधले आहे. 

 

या बातम्या वाचा 

गुटख्याची गाडी पकडली पण दाखवला जबरी चोरीचा गुन्हा

गुटखा तस्करीत नळदुर्ग पोलिसांचे हात गुंतले , हा घ्या पुरावा .... ( Video )

सपोनि गोरेनी सोडलेल्या 'त्या' टेम्पोमध्ये गुटखाच होता, हे घ्या आणखी एक पुरावा ....

गुटख्याच्या गाड्या पकडणाऱ्या पाच शहरात दहा टोळ्या

चोरावर मोर ! दाद ना फिर्याद ! ! गुटखा गाडी लुटली तरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नाही ...

धक्कादायक : नळदुर्ग पोलिसांची टू व्हीलर गाडी घेऊनच झिरो पोलिसांनी 'ती' गुटख्याची गाडी अडवली

गुटखा पकडला, गुन्हाही दाखल केला पण पण पुढे काय ?

From around the web