गुटखा पकडला, गुन्हाही दाखल केला पण पण पुढे काय ? 

मागील पाच  वर्षात एकाही गुन्ह्यात शिक्षा नाही ...
 
s

धाराशिव : तरुण पिढी गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाकडे वळू नये, यासाठी राज्य सरकारने पाच वर्षापूर्वी गुटखा विक्रीवर बंदी केली आहे . गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट सुगंधित तंबाखू, अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखू, खर्रा, मावा या स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही नावाने संबोधली जाणारी मिश्रणे. ग्राहकाला मिश्रण करण्यास सहजरीत्या सुलभ होईल, अशा रीतीने विकलेली किंवा वितरित केलेली स्वादिष्ट संबंधित तंबाखू आणि अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखू, गुटखा, पानमसाला, खर्रा, मावा व तत्सम पदार्थ एक उत्पादन म्हणून आवेष्टित केलेले अथवा खुले स्वरूपात विक्री , निर्मिती, साठवणूक , वितरण, वाहतूक यास जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी २० जुलै २०१८ पासून प्रतिबंध करण्यात आला आहे. 

 गुटखा, सुगंधी पानमसाला, मावा यांची विक्री व उत्पादनावर बंदी घालण्यात आली असली तरी परराज्यातून मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने गुटखा व पानमसाल्याचा साठा राज्यात येतो. ट्रकसह इतर वाहनांचा यासाठी वापर करण्यात येतो. राज्यातील स्थानिक बाजारपेठेत त्याचे वितरण केले जाते. महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट सुगंधित तंबाखू  शेजारच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून धाराशिव  जिल्ह्यातील उमरगा, नळदुर्ग मार्गे सर्व महाराष्ट्रात जात असल्याचे समोर आले आहे. 

आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून  गोवा गुटखा, बादशा , आरके गुटखा, सागर, विमल, हिरा, हिना, बाबा, आरएमडी असा दहा कंपनीचा गुटखा सप्लाय केला जातो. मुख्य  गुटखा तस्कर नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) आणि राम डोंबे ( बार्शी )  असून, त्यांचा लाखो  रुपयाचा हप्ता पोलिसाना सुरु आहे. धाराशिव जिल्ह्यातील पोलिसांना एका कंपनीकडून १६ लाख रुपये हप्ता येतो. अश्या जवळपास १० ते १५ कंपन्या आहेत. हप्ता १० ते १५ कंपन्यांकडून येत असला तरी हप्ता गोळा करणारे ते तीन पोलीस  साहेबाना मात्र दोनच कंपन्यांचा हप्ता पोहच करीत असल्याची कुजबुज आहे. 

 येरमाळा पोलीस स्टेशनचा के. बी. , एलसीबीचा  तुळजापूर बिटचा  ए. डी आणि नळदुर्गचा एक पोलीस  हे  गुटखा कंपनीकडून रोख स्वरूपात हप्ता गोळा करतात, नंतर ज्यांचा त्यांचा वाटा पोहच  करीत असल्याची माहिती एका गुप्त बातमीदारांकडून मिळाली आहे.  गुटख्याच्या तस्करीतून  येरमाळा पोलीस स्टेशनचा के. बी.ने पुण्यात चार फ्लॅट, वाशीजवळ दोन एकर जमीन घेऊन प्लॉटिंग केली आहे तसेच एक सोळा लाखाची गाडी घेतल्याची माहिती आहे. तुळजापूर एलसीबीचा 'ए. 'डी'  ची  खासगी सावकारकी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. 

एका गाडीत किमान ३० लाखाचा गुटखा असतो.हप्ता देऊनही अनेकवेळा झिरो पोलिसांमार्फत गुटख्याची गाडी पकडली जाते, त्याच्यावर भादंवि ३२८ नुसार गुन्हा दाखल  केला जातो, गुटखा सापडल्याचा ठोस पुरावा  असून देखील मागील पाच वर्षात एकाही  गुटखा पुरवठा करणाऱ्यास आणि विकणाऱ्यास शिक्षा झालेली नाही. अनेक  प्रकरणे न्यायालयात पेंडिंग आहेत. आरोपी न्यायालयात हजर राहत नाहीत. त्यांना वारंट निघाले तरी पोलीस त्यांना बजवात नाहीत, त्यामुळे गुटखा बंदी धाराशिवसह  महाराष्ट्रातील पोलिसांसाठी कुरण झाली आहे. 


कर्करोगसह अन्य रोगांचे प्रमाण वाढले 

गुटखा सेवन केल्याने अॅक्युट हायपर मॅग्नेशिया, हृदयरोग, कोरल सब म्युकस फायब्रोसिस, मुखाचा कर्करोग, ल्युक्योप्ल्याकिया, अन्न नलिकेचा कॅन्सर, पोटाचा कर्करोग, मेटाबाॅलिक अबनॉरमॅलिटी, प्रजनन, स्वास्थ्य, जठर व आतड्यांसंबंधीचे आजार होतात. शासकीय दंत महाविद्यालय नागपूर यांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने मुख कर्करोग झाल्याचे ८० टक्के रुग्ण आढळले आहेत. गुटख्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असली तरी धाराशिव जिल्ह्यातील पोलिसांचे खिसे मात्र गरम होत आहेत. 

कायदा कडक करा 

महाराष्ट्र सरकराने चांगला हेतू ठेवून गुटखा ,  पान मसाला, स्वादिष्ट सुगंधित तंबाखूवर बंदी घातली असली तरी त्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज आहे. गुटखा प्रकरणी भादंवि ३२८ नुसार गुन्हा दाखल  होत असला तरी त्यात अनेक पळवाटा आहेत. गांजाप्रमाणे गुटख्यावर देखील स्वतंत्र कलम काढून कडक पाऊले उचलण्याची गरज आहे. 
 

From around the web