मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवातही स्वातंत्र्यसैनिकांची उपेक्षा

आरोग्यासाठी कोणत्याही उपाययोजना सरकारकडे नसल्याची खंत
 
s
हयात स्वातंत्र्यसैनिकांना आरोग्याची सुविधा देण्याची मागणी

धाराशिव -  मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात अनेकांनी आहुती दिली. तर अनेकांनी प्राणपणाने लढून मराठवाड्यात तिरंगा फडकवला. या मुक्तिलढ्यामध्ये उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांचे मोठे योगदान आहे. सध्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. मुक्तिसंग्रामाच्या पंचाहत्तरीपर्यंत अनेक स्वातंत्र्यैनिक कालवश झाले. तर हयात असलेल्यांचे वय पाहता अनेकजण वार्धक्यामुळे विविध दुर्धर आजारांनी ग्रासलेले आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी कोणत्याही उपाययोजना महाराष्ट्र सरकारकडून केल्या जात नसल्याची खंत स्वातंत्र्यैनिकांसह त्यांच्या वारसांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वार्धक्यातील हयात स्वातंत्र्यसैनिकांना तरी मोफत आरोग्य सुविधा देण्यात यावी, अशी मागणी स्वातंत्र्यैनिक पाल्य संघटनेच्या अध्यक्ष सौ.शीला उंबरे-पेंढारकर यांनी केली आहे.

15 ऑगस्ट 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला, परंतु निजामशाहीच्या अधिपत्याखालील आंधप्रदेश, कर्नाटकसह मराठवाड्यातील 16 जिल्हे स्वातंत्र्यापासून दूर होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर निजाम राजवटीतील जनतेने मोठा उठाव केला. हा लढा चिरडण्यासाठी रझाकारांची मदत निजामाला घ्यावी लागली. तब्बल 1 वर्ष एक महिना तीव्र लढा इथल्या जनतेला द्यावा लागला. त्यानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस अ‍ॅक्शन (ऑपरेशन पोलो) चा पवित्रा घेऊन तब्बल चार दिवस लष्करी कारवाईनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करली. त्यानंतर निजाम राजवटीसह मराठवाड्यात तिरंगा फडकला.

s

मुक्तिसंग्रामाच्या या लढ्यात उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील जनतेनेही मोठा उठाव केला होता. या जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम, गोवा मुक्तिसंग्राम आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या 1664 स्वातंत्र्यसैनिकांची शासनाकडे नोंद आहे. त्यापैकी सध्या हयात स्वातंत्र्यैनिक आणि वारस असे 375 पेन्शनधारक आहेत. यामध्ये उस्मानाबाद (धाराशिव) 87, कळंब 60, लोहारा 35, उमरगा 104, तुळजापूर 38, परंडा 8, भूम 27, वाशी 24 अशी तालुकानिहाय संख्या आहे.

स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावणार्‍या या स्वातंत्र्यसैनिकांची मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षातही अवहेलना होत आहे. स्वातंत्र्यसैनिकांना गुडघेदुखी, सांधेदुखी, नेत्रविकार यासह विविध दुर्धर आजारांनी ग्रासलेले आहे. अशा दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी शासनाकडून 10 हजार रूपयांची मदत दिली जाते. ही मदत 5 लाखापर्यंत देण्यात यावी, स्वातंत्र्यैनिकांच्या वारसांना शासकीय नोकर्‍यांमध्ये आरक्षण देण्यात यावे, अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या घराची पडझड झाली आहे. त्यांना घर दुरूस्तीसाठी अनुदान देण्यात यावे अशा विविध मागण्या स्वातंत्र्यैनिकांसह स्वातंत्र्यैनिकांच्या वारसांमधून केल्या जात आहेत. मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात तरी शासनाने दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

From around the web