ऑक्सिजनचा प्रश्न सोडविण्यासाठी आणखीन चार प्लांट उभे करणार

  -पालकमंत्री शंकरराव  गडाख
 
ऑक्सिजनचा प्रश्न सोडविण्यासाठी आणखीन चार प्लांट उभे करणार

 उस्मानाबाद -  जिल्हयात कोरोनाचा उद्रेक वेगाने होत असल्याने माझे  कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन आजारी व्यक्तींचा  शोध घ्यावा व तातडीने  त्यांच्यावर उपचार करण्याची कारवाई सुरू करावी म्हणजे  मुख्यमंत्री यांचे या आवाहनाला यशस्वी करणे  शक्य होईल ,असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज  येथे केले . 

 उस्मानाबाद जिल्हयात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सद्यास्थितीचा आढावा आणि उपाय योजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात  आयोजित बैठकीत ते  बोलत होते.यावेळी खासदार ओमप्रकाश निबांळकर,आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. डी. के.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे, जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशिला देशमुख आदी उपस्थित होते.

    पालकमंत्री  म्हणाले , की रुग्णांची वाढती संख्या आणि संसर्गला आळा घालण्यासाठी लिक्विड ऑक्सिजन संख्या वाढवणे अत्यंत आवश्यक आहे- त्यासाठी प्रशासनाने आणखी चार ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन प्लांट लवकर उभारण्यासाठी पूर्ण वेगाने काम करावे जिल्हयातील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होणे आणि ऑक्सिजन युक्त खाट उपलब्ध करण्यासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याची  नितांत गरज आहे.रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शनपेक्षाही जास्त गरज ऑक्सिजनची  आहे .वेळेत आणि पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्याने रुग्णांचे आयुष्य वाचविण्यास मदत होईल त्यामुळे हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या ऑक्सिजन  जनरेशन प्लांट उभारण्यासाठी  प्रशासनाने मागणी प्रस्ताव तातडीने सादर करावा,असे निर्देशही मंत्री श्री . गडाख यांनी  यावेळी दिले .

    रेमडेसीवीर हे इंजेक्शन म्हणजे अमृत नाही .  त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी या औषधीसाठी गरज नसतांना मागणी करू नये ,  अथवा यासाठी सर्वत्र पळापळ करू नये , डॉक्टरांनी प्रमाणीत केल्याशिवाय रेमडेसीवीर कोणलाही मिळणार नाही याची नोंद घ्यावी असेही पालकमंत्री श्री  गडाख यावेळी म्हणाले . प्रशासन आणि आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयांना कोविड नियमावलीचे पालन करण्याबाबत निर्देशित करण्याबाबतही सुचना केल्या-रेमडेसीवीर इंजेक्शन गंभीर रुग्णांना प्राधान्याने गरजेनुसार दिला जात आहे . याची शहनिशा खासगी रुग्णालयातील नियुक्त  नोडल अधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे . तसेच डॉक्टरांनी सुध्दा आवश्यक असेल तेव्हाच या इंजेक्शनचा उपयोग करावा , असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

    या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी वेळेत कोरोना बाधितांची ओळख  पटणे आवश्यक आहे. यासाठी उस्मानाबाद जिल्हयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी”  या मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला असून  जिल्हयातील आशा वर्कर, ग्रामसेवक आणि शिक्षकांच्या माध्यमातून सर्वेक्षणाच्या कामास सुरूवात करावी . घरोघरी जाऊन चाचण्या करावे, प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान 50 लोकांच्या तपासण्या कराव्यात यामध्ये सुरूवातीला थर्मल स्कॅनर आणि ऑक्सिजनमीटर  व्दारे ताप आणि जर ऑक्सिजनचे प्रमाण तपासावे तसेच सर्दी आणि खोकला असलयास  आरोग्य कर्मचाऱ्यांकडून  त्याच्या RAT (रॅपिड ॲटीजन टेस्ट) अथवा RTPCR चाचण्या कराव्यात या मोहिमेत कोराना बांधित रुग्ण आढळल्यास त्या भागातील किंवा बांधितांच्या शेजाऱ्याच्या घरातल्या व्यक्तींच्याही चाचण्या घ्याव्यात आणि रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्याची कार्यवाही करावी,अशी सुचनाही पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी यावेळी केली.

    यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी   उस्मानाबाद जिल्हयाची कोविडची सद्यस्थिती मांडली . ते म्हणाले आजपर्यंत जिल्हयात 29 हजार 532 कोरोना बांधित रुग्ण आढळले असून 5 हजार 882  रुग्णांवर  उपचार सुरू आहे. 22 हजार 966 रुग्णं बरे होऊन घरी गेले तर 684 जणांचा मृत्यू  झाल्याचे त्यांन सांगितले . रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.8 आहे रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 38.5 असून जिल्हयात एकुण रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण 2.3 आहे 684 मृतां पैकी 520  पुरूष 164 महिलांचा समावेश आहे.त्यात 487 रुग्णं  हे 60 वर्षापेक्षा जास्त  वयाचे होते.असेही जिल्हाधिकारी  दिवेगावकर यांनी नमूद केले. मृतांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 352, तुळजापूर येथे 75 उमरगा येथील 70 कळंब तालुक्यातील 57 परंडा तालुक्यातील 49, भूम तालुक्यातील 34 वाशी येथील 31 आणि लोहारा तालुक्यात 16 जणांचे उपचार दरम्यान  मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.आतापर्यंत जिल्हयात 1 लाख 90 हजार 774 लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी 69 हजार 271 RT-PCR आणि 1 लाख 21 हजार 503 RAT  टेस्ट घेण्यात आले

    जिल्हयात 9 डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल (DCH),15 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरर्स आणि 29 कोविड केअर सेंटर्स आहेत.असे एकुण 53 इन्सीटिटयुर मध्ये 3 हजार 831 आयुसेलेशन खाटा 1 हजार 35 ऑक्सिजन युक्त खाटा 226 अतिदक्षता आणि 160 हेंटीलेटरर्स उपलब्ध असल्याचे ते म्हणाले ऑक्सिजन खाटांची वाढती आवश्यकता लक्षात घेता शासकीय रुग्णांलयात आणखीन 200 ऑक्सिजन युक्त खाटांचे काम प्रगतीपथावर असून तुळजापूर येथील भक्त निवास येथेही 50 बेडर्स तसेच जिल्हयातील 44 ग्रामीण रुग्णांलयात 300 ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या खाटांचे नियेाजनही प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचे दिवेगाकर म्हणाले,

    कोरोना लसीकरणाबाबत माहिती देताना  जिल्हाधिकारी म्हणाले की, 16 जानेवारी 2021 पासून जिल्हयात लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली.एकूण-93 केंद्रावर लसीकरणाचे कार्य सुरु आहे- . यामध्ये शासकीय 85 तर प्रधानमंत्री जनारोग्य योजना अधिस्वीकृत 8 केंद्राच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे.जिल्हयातील आरोग्य सेवक,फ्रंटलाईन वर्कर ..आणि 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेले एक लाख 6 हजार 322 लोकांना पाहिला डोस देण्यात आले तर 21 हजार 665 जणांनी दुसरी लासही घेतली आहे.जिल्हयाला मिळालेल्या लसींपैकी 12050 लसी शिल्लक असून अधिक 25 हजार लसींची आवश्यकता असेल असेही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी यावेळी नमूद केले. तत्पूर्वी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी तामलवाडी येथील ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड व कर्मचारी    उपस्थित होते.यावेळी त्यांनी ऑक्सिजन प्लांट बाबत माहिती घेतली आणि आवश्यक सूचनाही केल्या.

From around the web