धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर गुटखा प्रकरणी बोगस पत्रकारवर गुन्हा दाखल
धाराशिव - धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर अंबेजवळगा गुटखा प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एका बोगस पत्रकारावर अखेर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक दिवस उशिरा गुन्हा दाखल करणाऱ्या आणि तोडपाणी करणाऱ्या तीन पोलिसांवर आता कारवाई होणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अंबेजवळगा येथे बुधवारी दुपारी छापा मारून साडेपाच लाखाचा गुटखा ताब्यात घेतला होता पण २४ तास उलटून गेले तरी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता . धाराशिव लाइव्हच्या बातमीनंतर पोलिसांची धावपळ सुरु झाली . त्यानंतर गुरुवारी दुपारी अन्न आणि प्रशासन विभागाला पोलिसांनी पत्र दिले आणि रात्री आठच्या सुमारास या गुटखा प्रकरणी एका बोगस पत्रकारावर गुन्हा दाखल केला आहे.
हा बोगस पत्रकार पोलिसांचे नाव वापरून तयार करण्यात आलेल्या एका युट्युब चॅनलचा प्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्यास नीट लिहिता आणि वाचता येत नाही .चार चाकी वाहनात बसून पोलीस स्टेशनमध्ये युट्युब चॅनलचा बूम घेऊन जाऊन पोलिसांवर इंप्रेशन मारत होता आणि त्याच गाडीत गुटख्याचा धंदा करीत होता. अश्या बोगस पत्रकारामुळे धाराशिवची पत्रकारिता रसातळाला गेली आहे.
# या गुटखा प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बिट अंमलदार , मदतनीस आणि वसूलदार ( D / K / K ) यांनी गुटखा विक्रेत्याबरोबर तोडपाणी करून, किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते, तसेच बोगस पत्रकार ऐवजी त्याच्या भावाला आरोपी करण्याचे प्रयत्न सुरु होते. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर बोगस पत्रकारावर गुन्हा दाखल झाला असला तरी याप्रकरणी तीन पोलिसांवर आता कोणती कारवाई होणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
पत्रकारितेत शून्य मात्र गुटख्याच्या धंद्यात 'विशाल' कर्तृत्व गाजवणाऱ्या आणि दोन नंबर मध्ये 'पॉवर' असलेल्या या बोगस पत्रकारावर कोणते पोलीस फिदा होते, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.