उद्यापासून पाच दिवस धाराशिव नाट्य महोत्सव

नाट्य परिषद व विद्यापीठ उपकेंद्राचा पुढाकार
 
a

 धाराशिव -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील नाट्यशास्त्र व लोककला विभाग व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 29 मे ते 3 जून या कालावधीत धाराशिव नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ उपपरिसराच्या मिनी थिएटरमध्ये सायंकाळी 6 ते 10 या वेळेत वेगवेगळ्या समूहांचे नाटक सादरीकरण होणार आहे. या महोत्सवास जिल्ह्यातील नाट्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नाट्य परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल शिंगाडे व नाट्यशास्त्र व लोककला विभाग समन्वयक गणेश शिंदे यांनी केले आहे.

शहरातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना शिंगाडे यांनी सांगितले की, नाट्यचळवळ अद्याप ग्रामीण भागात पोहोचलेली नाही. या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नाटक पोहोचावे या उद्देशाने नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात उपकेेंद्र उपपरिसराच्या नाट्यशास्त्र व लोककला विभागातील विद्यार्थी हे नाटकाचे सादरीकरण करणार आहेत. हे विद्यार्थी देशातील विविध राज्यातून उपकेंद्र उपपरिसरात शिक्षण घेत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर रचलेली 15 नाटके महोत्सवात दररोज सायंकाळी 6 ते 10 या वेळेत सादरीकरण होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द अभिनेते उमेश जगताप यांच्या सोमवारी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

धाराशिव नाट्य महोत्सवास नाट्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संचालक उपपरिसर डॉ. डी. के. गायकवाड, अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल शिंगाडे, विभागाचे समन्वयक प्रा. गणेश शिंदे यांनी केले आहे.

ही नाटके होणार सादर

धाराशिव नाट्य महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी 6 वाजता दोरखंड व महारथी ही नाटके सादर होणार आहेत. 30 मे रोजी चुकलं वाटतं?, तफतीश, भगवद-अज्जूकम., 31 मे रोजी मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय, लड्डू, अनाघ्रात, 1 जून रोजी घुंगरू, दो हजार पच्चीस, लाईट अ‍ॅन्ड कॅमेरा, 2 जून रोजी अभिनेते, स्वप्नातलं स्वप्न, खटला, 3 जून रोजी रायगडाला जेंव्हा जाग येते ही नाटके सादर होणार आहे. रसिकश्रोत्यांनी या नाट्य महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 
 

From around the web