सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांची फसवणूक व दिशाभूल करणारा अर्थसंकल्प

-  ॲड रेवण भोसले
 
सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांची फसवणूक व दिशाभूल करणारा अर्थसंकल्प

उस्मानाबाद - राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनता ,शेतकरी ,तरुण, अल्पसंख्यांक, महिला, मागासवर्गीय यांच्यासाठी कसलीही भरीव तरतूद नाही तसेच शेतकऱ्यांसाठी प्रति महिना पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा एक शब्दही अर्थसंकल्पात उच्चारला नसून हा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी  सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांची फसवणूक व दिशाभूल करणारा मांडला असल्याचे स्पष्ट मत जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.

  शेतकऱ्यांसाठी फसवी कर्जमाफी योजना जाहीर केली असून राज्यातील 45 टक्के शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली असून सर्वसामान्य, बारा बलुतेदारांना, शेतमजूर तसेच रोजंदारी कामगारांना हातावर पोट घेऊन रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना या अर्थसंकल्पात कसलीही तरतूद करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात फक्त विकासाच्या गप्पा मारून फसव्या निरर्थक योजनांच्या पोकळ घोषणा करण्यात आलेले आहेत .

शेतकरी, कामगार व छोटे उद्योग यांना उध्वस्त करणारा अर्थसंकल्प आहे. बिल्डरांना ्रीमियम मध्ये 50 टक्के सूट देणार्‍या सरकारने महिलांना मात्र मुद्रांक शुल्कात फक्त एक टक्का सूट दिली .मराठवाडा वॉटर ग्रीडचा तर अर्थसंकल्पात कुठेही उल्लेख नाही. राज्यात परदेशी कंपन्या स्थापन झालेले नसताना तसेच कुठेही गुंतवणूक झालेली नसताना रोजगाराच्या संधी देण्याचे बेरोजगार तरुणांना या अर्थसंकल्पात गाजर दाखवले आहे. 

एकीकडे महागाई तर दुसरीकडे कोरोनाचे संकट यामध्ये सापडलेली सर्वसामान्य जनता वाढत्या  महागाईमुळे रडकुंडीस आलेली आहे परंतु महागाई कमी करण्यासाठी ठोस अशी उपायोजना या अर्थसंकल्पात कुठेही दिसून येत नाही. पेट्रोल डिझेल वरील थोडीही करकपात न केल्यामुळे महागाईचा भडका पुन्हा उडेल. मराठवाड्यासाठी या अर्थसंकल्पात कसलीही भरीव तरतूद न केल्यामुळे घोर अन्याय झाला आहे .अर्थमंत्र्यांनी पोकळ घोषणांचा पाऊस पाडून सर्वसामान्य जनता ,शेतकरी ,शेतमजूर ,तरुण, कामगार, अल्पसंख्यांक, महिला यांची दिशाभूल व फसवणूक केली असल्याची टीका ॲड भोसले यांनी केली आहे.

From around the web