विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचार्‍यांचे लाक्षणिक संप आंदोलन

4 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा सरकारला इशारा !
 
s

उस्मानाबाद - अव्वल कारकून संवर्गातील पदोन्नतीच्या प्रलंबित असलेल्या प्रस्तावासह विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मार्चअखेरीस हे आंदोलन तीव्र होऊन सोमवारी (दि.28) गट क संवर्गातील कर्मचार्‍यांनी लाक्षणिक संप पुकारला. या आंदोलनामुळे महसूल विभागातील कामकाज ठप्प होते.  

महसूल विभागातील अव्वल कारकून संवर्गात पदोन्नतीच्या प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना विभागनिहाय मंजुरी देऊन तात्काळ आदेश निर्गमित करावे, महसूल सहायकाची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटना (गट क) आक्रमक झाली आहे.  संघटनेच्या वतीने दि. 21 मार्च रोजी दुपारच्या जेवणाच्या सुट्टी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. दि. 23 मार्च रोजी काळ्या फिती लावून कामकाज केले.

आज सोमवारी गट क संवर्गातील कर्मचारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेले. त्यामुळे महसूल विभागातील कामकाज दिवसभर ठप्प होते. मागण्यांची शासनाने दखल न घेतल्यास येत्या 4 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितेश काळे, सरचिटणीस श्रीमती श्यामल वाघमारे, सचिव शुभम काळे यांची स्वाक्षरी आहे.

From around the web