डॉ. आंबेडकर वाचलेला माणूसच आंबेडकरवादी !

व्याख्यानमालेत प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे यांचे प्रतिपादन
 
asd

 उस्मानाबाद - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समाजवाद हा हुकुमशाही टाळतो. त्यांचे विचार आणि साहित्य आत्मसात करणारा व्यक्तीच आंबेडकरवादी होवू शकतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे उपस्थित होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामुहिकरित्या अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  

पुढे बोलताना प्रा. डॉ. कोल्हापुरे म्हणाले की, आपल्यात म्हणावे तसे समीक्षक, नाटककार तयार झालेले नाहीत. आपल्या साहित्याची प्रेरणा ही बौद्ध तत्त्वज्ञानातील असली पाहिजे. बौद्ध साहित्यातच सर्वांचे कल्याण आहे. जो पंचशील त्रिशरणचे पालन करतो, तो चांगला माणूस. जो दुसर्‍यांना पालन करायला लावतो तो श्रेष्ठ माणूस! ब्राह्मण व क्षत्रिय या दोन वर्णांतून शूद्र तयार झाले. बाबासाहेबांनी मानववंश शास्त्राचा अभ्यास केला. बाबासाहेबांनी वर्णाचे मूळ कुठे आहे? हे शोधून काढले आहे. बाबासाहेबांनी जे सांगितले ते न सांगता आपण दुसरे सांगतो, असेही त्यांनी नमुद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे म्हणाले की, बुद्ध हा इझम आहे. पहिला समाजशास्त्रज्ञ व मानव वंशशास्त्रज्ञ हा बुद्धच होता. जगभर विचारवंतांची हत्या करून त्यांचे विचार संपविले जातात. परंतु भारतात हत्या न करता ते संपविले जातात. ही क्रांती प्रतिक्रांतीची लढाई आहे. तरुणांनी विचारवंताचे साहित्य, कलाकारांच्या कला, कोणत्या पद्धतीने येत आहेत ते पाहिले पाहिजे. परिशीलन, चर्चा, विचार करणारी नवी मांडणीही तरूणांनी करावी, असे मतही भंडारे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. महेंद्रकुमार चंदनशिवे यांनी केले. सूत्रसंचलन मारुती पवार यांनी तर आभार नागनाथ गोरसे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

From around the web