लातूर-टेंभुर्णी ह्या राष्ट्रीय महामार्गासाठी 79 कोटी 36 लाख निधी मंजूर 

खा. ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश 
 
लातूर-टेंभुर्णी ह्या राष्ट्रीय महामार्गासाठी 79 कोटी 36 लाख निधी मंजूर

उस्मानाबाद -  उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. लातूर-टेंभुर्णी या  राष्ट्रीय महामार्गासाठी 79 कोटी 36 लाख निधी मंजूर झाला आहे.

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा मुख्य मार्ग असलेला (N.H-548 C/NH-63) टेंभुर्णी - कुर्डुवाडी - बार्शी - येडशी हा आहे. हा महामार्ग लातूर, उस्मानाबाद व सोलापूर या जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे. या महामार्गाच्या 163 कि.मी. पैकी 101 कि.मी.  उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातुन जातो.  या महामार्गाची स्थिती वाहतुकीस अनुकूल नसल्याने टेंभूर्णी-बार्शी मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत होते. त्याअनुषंगाने  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी , दि. 29 सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कडे पाठपुरावा केला होता. 

लातूर- मुरुड- ढोकी-येडशी- कुर्डुवाडी- टेंभुर्णी हा राष्ट्रीय महामार्ग मराठवाडयातून पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबईला दळणवळण करणेकरीता वापरण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याची दुरावस्ता होऊन अपघाताने जिवीत व वित्त हानी मोठया प्रमाणावर होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. 21 नोव्हेंबर 2019 रोजी तारांकित प्रश्न क्र.71 नुसार अधिवेशन मध्ये प्रश्न उपस्थित केला होता. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात दि.09 मार्च 2021 रोजी नियम 377 च्या माध्यमातून मंत्री महोदयांचे लक्ष वेधले होते व रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. सदर पाठपुराव्याला यश आले असून लातूर- मुरुड- ढोकी- येडशी- कुर्डुवाडी- टेंभुर्णी ह्या राष्ट्रीय महामार्गासाठी 49 कोटी 12 लाख तसेच बार्शी-येडशी-मुरुड-लातूर- सग्रोली या महामार्गासाठी 30 कोटी 24 लाख असे एकूण 79 कोटी 36 निधी मंजूर  झाला आहे. 

From around the web