उस्मानाबाद जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात आढळले 171 नवीन कुष्ठरुग्ण

 

उस्मानाबाद - जिल्ह्यात दि. 13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. यासाठी आशा आणि पुरुष स्वयंसेवक यांचे एक हजार 203 पथके तयार करून घरोघर सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 15 लाख 03 हजार 795 इतक्या लोकसंख्येची तपासणी करण्यात आली. (ग्रामीण भागातील शंभर टक्के आणि शहरी भागातील अति जोखमीचा भाग)

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तपासणी केलेल्या लोकसंख्येच्या 0.5 टक्के संशयित रुग्ण शोधणे अपेक्षित होते. उस्मानाबाद जिल्ह्यात 0.53 टक्के संशयित शोधले आहेत. संशयिताच्या तीन टक्के नवीन रुग्ण शोधणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात 7 हजार 911 संशयित शोधण्यात आले आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत 6 हजार 290 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेल्या संशयितामधून 171 नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले आहेत.  उर्वरित संशयितांची 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये चांगली बाब म्हणजे 171 पैकी 132 (77 टक्के) असांसर्गिक रुग्ण असून 39 (23 टक्के) सांसर्गिक रुग्ण आहेत. बाल रुग्णात फक्त 6 रुग्ण सापडले असून त्याचे प्रमाण (3.5 टक्के) इतके आहे. यावरून रोग प्रसाराची साखळी कमी होत आहे. नवीन रुग्ण लवकरात लवकर शोधून उपचारा खाली येत असल्याचे दिसून येते. मोहिमेमध्ये शोधलेल्या 171 रुग्णांपैकी 70 टक्के रुग्णांची डिस्टिक न्यूक्लियस पथकाने पडताळणी केली आहे. माहे ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्ह्यातील दहा हजार लोकसंख्येतील क्रियाशील कुष्ठ रुग्णांचे प्रमाण 1.3 इतके आहे.

         नवीन रुग्ण शोधण्याचे एक लाख लोकसंख्या मधील प्रमाण 24.7 इतके आहे. बाल रुग्णाचे प्रमाण 2.42 टक्के आहे. सांसर्गिक रुग्णाचे प्रमाण 36.36 टक्के आहे. विकृती रुग्णांचे प्रमाण 0.6 टक्के आहे. रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी इतर आजारांमध्ये लसीकरण केले जाते. परंतु कुष्ठरोगावर लस उपलब्ध नाही. म्हणून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नवीन शोधलेल्या कुष्ठ रुग्णाच्या जवळच्या सहवासिताना आजार होऊ नये म्हणून (Post exposure prophylaxis) Rifampicin गोळ्यांचा त्यांचे वय आणि वजनानुसार एक डोस दि. 14 ऑक्टोबर 2022 आणि दि. 21 ऑक्टोबर 2022 या दिवशी देण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी वेळोवेळी आढावा घेऊन मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सहाय्यक संचालक कुष्ठरोग, वैद्यकीय अधिकारी डी एन टी पथक,सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, सर्व कुष्ठरोग कर्मचारी,आशा व पुरुष स्वयंसेवक सहकार्य केले.

From around the web