लस घेतली तरी कोरोना का होतो  ? एक कारणमीमांसा ...

 
d

कोरोनाची दुसरी लाट जवळपास संपत चालली आहे. पहिल्या लाटेत कुणालाही लस मिळाली नव्हती, पण दुसऱ्या लाटेत लस घेवूनही काहींना  कोरोनाची लागण झाली, त्यामुळे लस घेवून  तरी काय फायदा ? असा गैरसमज अनेक नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.२ जून रोजी लस घेतल्यानंतर मी काही मित्रांशी चर्चा केली. त्यातून काही समज - गैरसमज समोर आले. 

औरंगाबादच्या एका शासकीय कार्यालयात माझे एक तरुण मित्र आहेत. प्रकृतीचा कसलाही त्रास नाही. म्हणजे ( बीपी/ शुगर ) वगैरे नाही. तब्येत अगदी ठणठणीत. फ्रंट वर्कर म्हणून ४ मार्च रोजी त्यांनी कोविशील्डची पहिला डोस  घेतला आणि १२ मार्च रोजी कोरोनाची बाधा झाली. घरीच उपचार घेवून  बरे झाल्यानंतर पुन्हा ३८ दिवसांनी पुन्हा कोरोना झाला आणि कोविड  सेंटरमध्ये भरती व्हावे लागले. म्हणजे एकदा कोरोना झाल्यानंतर पुन्हा सहा महिने कोरोना होत नाही, हा गोड  गैरसमज येथे पार गळून गेला. तसेच लस घेतल्यानंतर १५ दिवसांनी प्रतिकारशक्ती वाढते, हा समज देखील येथे छेद देत आहे. 

या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली असता, नाव न छापण्याच्या अटीवर ते म्हणाले की , शासकीय कार्यालयात काम करीत असल्याने काही लोकांच्या संपर्कात यावे लागते. सर्व पथ्ये पाळली होती. तरीही एकदा नव्हे दोनदा कोरोना झाला. लस घेऊनही कोरोना कसा झाला ? याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. मात्र एक निश्चित आहे की , दोन्ही वेळी ऑक्सिजनची गरज भासली नाही. 

त्यांचे म्हणणे असे की , कोरोना झाला तरी न घाबरता त्याला फाईट केले पाहिजे. खासगी रुग्णलयात भरती न होता, शासकीय रुग्णालयात भरती व्हावे. खासगी रुग्णालयात विनाकारण नको त्या टेस्ट करून रुग्णाची लूट केली जाते. पीपीपी किट, हॅन्ड ग्लोज एकच वापरून त्याचे बिल मात्र सर्व रुग्णाच्या माथी मारले जाते. शासकीय रुग्णालयातच योग्य उपचार होतात. 

कोरोना संकटात डॉक्टरांच्या बरोबरीने २४ तास सेवा देणाऱ्या केमिस्टसना फ्रंट वर्कर म्हणून अजून तरी मान्यता मिळाली नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील २५९ केमिस्टसना कोरोनाची लागण  झाली असून ,त्यातील १६ जण दगावले आहेत. उस्मानाबादचे प्रसिद्ध मेडिकल दुकानदार आणि आमचे मित्र मुकेश नायगांवकर यांनी आपला कोरोनाबाबतचा अनुभव सोशल मीडियावर शेयर केला आहे. हा  अनुभव त्यांच्यात शब्दात जश्याचा  तसा.. 

19 एप्रिल रोजी covaxin लस घेतली. दुसर्‍या दिवशी कणकणी जाणवू लागली.तिसऱ्या दिवशी त्रास वाढला. अॅटिजेन टेस्ट केली .22 एप्रिल 2021 रोजी कोरोना  बाधीत झालो.डाॅ.भारत माने यांचे औषधोपचार सुरु केले .दोन दिवसांत खोकला वाढला.तिसऱ्या दिवशी HRCT केले .स्कोर वाढला होता. डाॅ.भारत माने सरांनी तातडीने अॅडमिट व्हायचा सल्ला दिला.

या अगोदर माझी दोन्ही मुले आणि  दुकानांतील दोन मुलेही पाॅझिटिव्ह झाली होती.हे चौघेही विलगीकरण व औषधोपचाराने लवकर बरे झाले.याच वेळी पत्नी रोहिणी आजारी पडल्यावर निदान होत नव्हते. यादरम्यान त्यांच्या महिन्यांत चार वेळा अॅटिजेन,HRCT, RTPCR, टेस्ट केल्या .सर्व निगेटिव्ह रिपोर्ट आले. तरीही अशक्तपणा होताच.असे घरातील एकंदर वातावरण होते.

अशातच मी पाॅझिटिव्ह झाल्याने  वातावरण शांत आणि  गंभीर झाले.उस्मानाबादेत त्यावेळी परिस्थिती खुपच बिकट होती.बेड मिळत होते पण रेमिडीसिवर नाही अशी परिस्थिती होती. मुलगा नुपूरने तुळजापूरचा मित्र सुरज सुरेश पाटील यांस फोन केला.त्याचे आत्येभाऊ डाॅ.दिग्विजय कुतवळ तुळजापूर यांच्या रुग्णालयात दाखल झालो.धीर द्यायला सोबत शिवरायांचा मावळा पुतण्या ओंकार होताच.

डाॅ.दिग्विजय यांनी तपासून तातडीने उपचार सुरु केले. उपचारादरम्यान रेमिडीसिवर इंजेक्शन्सची गरज लागली आणी ऑक्सिजन सुध्दा पण यासाठी कुठेही धावपळ करावी लागली नाही.औषधासाठी दुकानातही जावे लागले नाही. यादरम्यान डाॅ.दिग्विजय यांनी खुप काळजी घेतली.तेथील स्टाफही खुप प्रेमळ आहे.याचाच परिणाम म्हणून मी आठ दिवसांत डिस्चार्ज घेऊन घरी आलो.अशक्तपणा होता. समतोल आहार घेतला.सोबत सर्वांच्या प्रेमळ  सदिच्छा होत्याच.त्या खुप महत्त्वपूर्ण ठरल्या.हळूहळू प्रकृतीत  चांगला फरक जाणवू लागला. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे विश्रांती घेतली आणीन  अजुनही घेत आहेच.

यादरम्यान सर्व मित्र,हितचिंतक, नातलग,यांनी फोनवर बोलून मोठा धीर दिला. याचाच परिणाम म्हणून मी आता पुर्णतः बरा झालो आणि  आज 45 दिवसांनी दुकानी आलो. मी स्पोर्ट्समन असल्याने व नेहमीच सकारात्मक असल्याने याचा या आजारपणात खुप फायदा झाला. स्वतः कणखर,सकारात्मक राहणे डाॅक्टरांनी सांगीतलेल्या सुचनांचे पालन करणे,आणी न घाबरणे .हे संकटमुक्त होण्यासाठी नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे.
यामुळे कोरोनाच काय .... आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यावर मात करता येईल.
... 

मुकेश नायगावकर यांना  गेले  वर्षभर कोरोना झाला नाही आणि नेमके  लस घेतल्यानंतर कोरोना कसा झाला ? यावर चर्चा करताना एक मुद्दा लक्षात आला की,  रेमिडीसिवर इंजेक्शन कोरोनावर गुणकारी असले तरी ओव्हर डोस  झाल्यामुळे एक महिना झाला तरी अशक्तपणा ( कमजोरपणा ) गेलेला नाही. तसेच लस घेताना गर्दी झाल्यामुळे आजवर त्यांच्यापासून लांब असलेल्या कोरोनाने कवेत घेतले. तसेच लस घेवून  चार दिवसहि झाले नाहीत, तोच कोरोना झाल्यामुळे प्रतिकारशक्ती तयार झाली नव्हती, हे मात्र खरे आहे. 

इतकेच काय तर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनाही लस घेतल्यानंतर आठ दिवसात कोरोना झाला होता, त्यावेळी मीडियाने बातम्या देखील प्रसिद्ध केल्या होत्या . 

लस घेतल्यानंतर कोरोना कसा काय होतो तर ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी काही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी ( गट - अ ) संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष डॉ महेश गुरव यांच्या मते , लसीचे दोन्ही डोस  घेतल्यानंतर किमान १५ दिवसाने शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते. तसेच लस घेतली म्हणजे कोरोना नाही होत हा भ्रम चुकीचा आहे. पथ्ये नाही पाळली  तर कोरोना होणारच  पण रुग्णालयात भरती होण्याचे आणि लक्षणे येण्याचे प्रमाण नगण्य आहे. दोन्ही लसीचे डोस घेतलेला रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होऊ शकतो. ज्यांना एक डोस  घेतल्यानंतर लगेच आठ दिवसाच्या  आत कोरोनाची  बाधा झालेली असेल तर त्याला अगोरच सौम्य लक्षणे असतात आणि लस घेतल्यानंतर जो अशक्तपणा येतो, त्यामुळे त्याची लक्षणे अधिकच जाणवू लागतात.  दोन्ही डोस  घेतल्यानंतरच १५ दिवसानंतर खऱ्या अर्थाने सुरक्षा कवच तयार होते. 

अनेक जण पहिला डोस  घेतल्यानंतर लगेच बरे वाटू लागले की , बाहेर फिरतात. शरीरात अशक्तपणा असताना बाहेर फिरणे चुकीचे आहे. किमान आठ दिवस सक्तीची विश्रांती घेतली पाहिजे. शरीरातील अशक्तपणाच कोरोना लोहचुंबकाप्रमाणे खेचून घेतो. 

त्यामुळे लस घ्या. लसीबद्दल गैरसमज काढून टाका. लाट असो अथवा नसो, बाहेर जाताना  मास्क वापरा. जवळ सॅनिटायझर ठेवा. घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवा. सर्दी, खोकला, ताप, शिंका यापैकी कोणतेही लक्षणे असतील तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या. काळजी घ्या. कोरोनापासून स्वतःला आणि कुटुंबाला नेहमीच सुरक्षित ठेवा. 

- सुनील ढेपे 
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 
Mobile - 9420477111

हेही  लेख वाचा 

  • लस हे कोरोनावरचे अमृत नाही, पण ...

  • कोरोनापासून माणूस धडा घेईल का ?

या लिंकवर 

https://www.dhepe.in

From around the web