'कॅप्टन कूल' आणि भरजरी झूल !

 
'कॅप्टन कूल' आणि भरजरी झूल !

आपण सध्या भयंकर कालखंडात जगतोय. एकीकडे कोरोनाच्या प्रकोपाची भिती तर दुसरीकडे वैयक्तीक आयुष्यातील संघर्षाच्या दुहेरी कचाट्यात सर्वसामान्य सापडले आहेत. रस्त्यांवरून पायपीट करत आपल्या गावाकडे परतणार्‍यांशी अथवा निवारागृहातील आबालवृध्दांशी बोलून बघा. प्रत्येकाची कथा व व्यथा ऐकून गलबलून येते. त्यांच्यावर अक्षरश: आभाळ कोसळले आहे. फाळणी नंतरचे सर्वात मोठे व भयावह मानवी विस्थापन आपल्या डोळ्यासमोर पाहतांना आपल्या समाजात किती टोकाची विषमता आहे याची भेदक जाणीव होते. या भयंकर कोलाहलात वैयक्तीक आणि सामूहिक जीवनातील बदललेले वर्तन अनुभवणे हा एक वेगळाच अनुभव असल्याचे माझे मत आहे. खरं तर संकट समयी मानवातील अनेक गुण व अर्थातच दुर्गुण उफाळून येत असतात. काही वेळेस आपले आधीचे अंदाज चुकतात तर काहीदा अनपेक्षीत बाबी समोर येतात. या पार्श्‍वभूमिवर, कोरोनाच्या कालखंडात आपण अनुभवत असलेले क्षण हे लवकरच इतिहासात नोंदले जाणार आहेत.


कोरोनाचा प्रतिकार करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मार्केटींगचे स्कील पुन्हा एकदा खुबीने वापरले आहे. यामुळे थाळ्या पिटण्यापासून ते दिवे लावण्यापर्यंतचे दोन्ही कार्यक्रम सुपरहिट ठरले आहेत. लवकरच भारत कोरोनामुक्त झाल्यानंतर अख्ख्या देशाने याचे कसे सेलीब्रेशन करावे ? यासाठीचे काही तरी नियोजन मोदी वा त्यांच्या सल्लागारांच्या डोक्यात सुरू असेलच. संकटात संधी शोधण्याचे मोदींचे स्कील गुजराथी बांधवांच्या व्यापार कौशल्याशी सुसंगत असेच आहे. नरेंद्र मोदी हे भारताच्या राजकीय इतिहासातील 'ग्रेट शो मॅन' असल्याचे आधीच सिध्द झाले आहे. कोरोनाच्या आपत्तीतही मोदींच्या मार्केटींग स्कीलचा नवीन आयाम आपल्याला दिसून आला. तर दुसरीकडे कोणताही आव न आणता काही माणसे अतिशय शांतपणे काम करत आहेत. खरं तर मराठी माणूस हा मार्केटींगमध्ये खूप कमजोर आहे. यामुळे शाहू-फुले-आंबेडकरांचा समतेचा विचार असो की, प्रखर हिंदुत्ववादी विचार...यांचे जन्मस्थान महाराष्ट्रच असले तरी याचे जोरदार मार्केटींग आपल्याला जमले नाही. यामुळे केंद्रीय राजकारणात मराठी राजकारणी खर्‍या अर्थाने सर्वोच्च पातळीवर गेलेच नाही. मात्र आपण स्वप्रसिध्दीत मागे असलो तरी कर्तबगारीत इतरांपेक्षा कांकणभर पुढेच असतो हे देखील तितकेच खरे. याच प्रकारे मराठी माणसाच्या कर्तबगारीचा एक नवीन अध्याय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून लिहला जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या संयमित, विवेकपूर्ण व अचूक पध्दतीत स्थिती सांभाळलीय ते अतिशय कौतुकास्पद आहे. राज्यातील जनतेला ब्रिफींग करतांना राजेश टोपे अचूक माहिती देतात. तर उध्दव ठाकरे हे प्रशासकीय उपाययोजनांसोबत जनतेशी थेट संवाद साधतांना दिसताय.

कर्णधार मग तो खेळातला असो की राजकारणातला ! वेळ पडल्यानंतर त्यालाच मैदानात सर्वात आधी उतरावे लागते. यशाचा धनीही तोच होतो अन् अपयशाचाही. त्याला अतिशय संयम राखावा लागतो. यशाचा उन्माद अन् अपयशाचे नैराश्य कधी जाहीर करावे लागत नाही. या निकषांचा विचार करता, आज उध्दव ठाकरे हे हे महाराष्ट्राचे खर्‍या अर्थाने 'कॅप्टन कूल' असल्याचे सिध्द झाले आहे. त्यांच्या बोलण्यात एकाच वेळी आश्‍वासकता आणि काळजी या दोघींचा मिलाफ असतो. ते संकल्पाची भाषा बोलतात अन् यासाठी लागणार्‍या परिश्रमांचीही ! याचमुळे घरातील एखाद्या वडीलधार्‍या व्यक्तीप्रमाणे त्यांना ऐकावेसे वाटते. गेल्या काही दिवसांमध्ये शहरी, ग्रामीण आणि महानगरीयच नव्हे तर ग्लोबल मराठी जनांशी साधलेल्या संवादातून उध्दव ठाकरे यांच्याबाबतचा आदर दुणावल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियात बहुतांश नेत्यांबाबत ट्रोलींग होत असतांना ठाकरे यांच्याबाबत कौतुकाची लाट उसळल्याचेही आता दिसून आले आहे. खुद्द उध्दव ठाकरे हे कधीपर्यंत मुख्यमंत्री राहतील ? त्यांच्या उर्वरित कारकिर्दीची नेमकी काय वाटचाल असेल ? ते अजून नेतृत्वाची नेमकी किती उंची गाठतील ? या प्रश्‍नांची उत्तरे काळच देणार आहे. तथापि, अनेक दशकांमधून पहिल्यांदाच इतक्या भयंकर पध्दतीत कोसळलेल्या आपत्तीच्या कालखंडात उध्दव बाळासाहेब ठाकरे या माणसाने अतिशय धीरोदत्तपणे केलेले महाराष्ट्राचे नेतृत्व हे कधीही विस्मरणात जाणार नाही.

एकीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे संयमी नेतृत्व उजळून निघत असतांना पंतप्रधान मोदी यांनी भारतीय मानसिकतेचा किती सखोल विचार केलाय हे देखील अधोरेखीत झाले आहे. राजकारण, क्रिकेट आणि बॉलिवुड यांच्या जोडीला उत्सवप्रियता हा भारतीयांचा वीक पॉइंट असल्याचे त्यांनी लक्षात घेतले आहे. यामुळे कोरोना सारख्या अत्यंत गंभीर आव्हानाच्या प्रतिकार करतांनाही त्यांनी स्वप्रतिमेला उजळण्यासाठी उपयोग केल्याचे दिसून येत आहे. टाळ्या-थाळ्या आणि दिवे व मोबाईलच्या फ्लॅशला मिळालेला पाठींबा हेच दर्शवत आहे. यातच भाजपच्या स्थापना दिनाला पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना एक वेळेस उपाशी राहून गरजूंना मदत करण्याचे केलेले आवाहन देखील याच प्रकारातील आहे. येत्या काही दिवसांमध्ये भाजपला यातून एक मोठा व भावनिक मुद्दा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात, एकीकडे संयमी पध्दतीत परिस्थिती हाताळणारे उध्दव ठाकरे तर दुसरीकडे विजेत्याच्या देहबोलीसह आक्रमक मार्केटींग रणनिती अंमलात आणणारे नरेंद्र मोदी असे दोन प्रकारचे नेतृत्व आपल्याला दिसत आहेत.
काही शतकांपूर्वी संत चोखा मेळा यांनी विचारलेल्या ''काय भुललासी वरलिया रंगा ?'' या प्रश्‍नाचे उत्तर आज देखील मिळालेले नाही. आजही वरवरचा रंग हाच लोकांना भुलवितो अन् संमोहित करतो हे दिसून येत आहे. याचा विचार करता पंतप्रधान मोदी हे पॉप्युलर भाषेत बोलून भारतीय मानसिकतेला आवडणार्‍या घटकांचा खुबीने वापर करत असल्याचे अधोरेखीत झाले आहे. प्रचारतंत्राची ही भरजरी झूल मोदींच्या इमेज बिल्डींगमध्ये उपयोगात आणली जात आहे. यात ते आतापर्यंत तरी यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र भारतीय राजकारणाचा इतिहास लक्षात घेता; अनेकदा उच्च दर्जाचे कुशल प्रचारतंत्र देखील फोल ठरते. अथवा यातील बेगडीपणा समोर येतो. मोदींच्या प्रचारतंत्राचे कधी तरी खरे मूल्यमापन होईलच. अर्थात, कोरोनाच्या आपत्तीलाही प्रचारतंत्र बनविण्याचा ' मोदी पॅटर्न' दीर्घ काळापर्यंत स्मरणात राहील हे देखील तितकेच खरे.

दरम्यान, कोरोना आपत्तीच्या कालावधीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना देखील विसरता येणार नाही. खरं तर, प्रदीर्घ लिहणे वा बोलणे तुलनेत सोपे असते. तथापि, संक्षिप्त आणि त्यातही अजस्त्र जनसमुदायाला आकर्षीत करणार्‍या कॅचलाईन्स लिहणे खूपच कठीण असते. याचमुळे कॉपीरायटींगला खूप महत्वाचे स्थान आहे. याचा विचार करता, कोरोना विरूध्दच्या लढाईला रामदास आठवले यांनी ' गो कोरोना गो...' ही (प्रारंभी थिल्लर वाटणारी) दिलेली घोषणा कोट्यवधी आबालवृध्दांच्या तोंडी बसल्याचे आपल्याला दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या स्क्रीप्टला चपखल स्लोगन देत आठवलेंनी भाजप सोबतचे सहयोगीत्व आपल्या सृजनातून (सृजन हा शब्द उपहासाने नव्हे तर कौतुकाने !) सिध्द केले हे नाकारता येणार नाही.

- शेखर पाटील
जळगाव 

From around the web